मुंबईः राज्यभरात भावपूर्ण वातावरणात गणपती विसर्जन करण्यात आलं. मात्र काही ठिकाणी गणपती विसर्जनाला गालबोट लागला. गणेश विसर्जनादरम्यान राज्यातल्या विविध भागात 15 जणांचा बुडून मृत्यू झाला. एकट्या नाशिक जिल्ह्यातच तब्बल सात जणांचा मृत्यू झाला.


नाशिकः सिन्नरमध्ये गणपती विसर्जनाला सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानासह एकाचा बुडून मृत्यु झाला. जवान संदीप शिरसाठ, रामेश्वर शिरसाठ यांचा मुसळगाव येथील देवनदी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. तर गंगापूर रोडमध्ये बुडून एकाचा मृत्यृ झाला.

मालेगाव तालुक्यातही गणेश विसर्जनाला गालबोट लागलं. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

औरंगाबादः परमेश्वर विट्ठल शेंगुळे यांचा कायगाव टोका येथे गणपती विसर्जन करताना गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. परमेश्वर शेंगुळे हे वाळूज येथील स्मॉल वंडर स्कूलचे सहशिक्षक होते.

जळगावः जामनेर तालुक्यात गणेश विसर्जन करताना कांग नदीमध्ये दोन तरुण बुडाले. एकाचा मृतदेह हाती लागला तर एक जण बेपत्ता आहे.

नांदेड: कुंडलवाडी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला.

वर्धाः वर्ध्यात आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथे गणपती विसर्जनासाठी नदीत गेलेल्या चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील कडा नदीवरील ही घटना आहे.