लेझीम खेळताना हार्ट अटॅकने मृत्यू, कोल्हापुरातील धक्कादायक घटना
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2016 03:29 PM (IST)
कोल्हापूर : गणपती विसर्जनादरम्यान लेझीम खेळताना हार्ट अटॅक येऊन एकाचा मृत्यू झाला. संजय आनंदा पाटील असं या 48 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. करवीर तालुक्यातील गिरगाव इथं ही धक्कादायक घटना घडली. संजय पाटील हे भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेले आहे. गिरगावातील जय हनुमान तालीम मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु होती. पारंपारिक हलगी-लेझीमच्या ठेक्यावर ही मिरवणूक निघत होती. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर संजय यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना तातडीने कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. गणपती विसर्जनादरम्यान इतकं मोठं विघ्न आल्याने, संपूर्ण गिरगावावर शोककळा पसरली आहे.