14th June Headlines: राज्यात आज अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आषाढीच्या निमित्ताने वारी सुरू आहेत. दोन दिवसांच्या मुक्कामा नंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरीच्या दिशेने निघणार आहे. आजचा मुक्काम सासवड येथे असणार आहे. तुकोबांची पालखी पुणे मुक्कानंतर आज पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे. तर, दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही घडामोडी असणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटची बैठक आहे. तर, खासदार शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. कोर्टातही महत्त्वाच्या सुनावणी आहेत.
पालखी सोहळा
- दोन दिवसांच्या मुक्कामा नंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरीच्या दिशेने निघणार आहे. आजचा मुक्काम सासवड येथे असेल. पुढचे दोन दिवस मुक्काम सासवडला असणार आहे.
- तुकोबांची पालखी पुणे मुक्कानंतर आज पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आज दुपारी 1 वाजता वडकी नाला ते दिवेघाट माथा दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सुप्रिया सुळे वारकऱ्यांसोबत काही पावले चालणार आहेत.
- अहमदनगर – पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय यांची मनाची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या पालखीत जिल्ह्यातील जवळपास 20 हजाराहून अधिक वारकरी असतात. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते दरवर्षी पूजा संपन्न होते, जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे देखील दिंडी प्रस्थानावेळी उपस्थित रहाणार आहेत.
- अहमदनगर – संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर शहरात मुक्कामी येणार आहे. संध्याकाळी 6 वाजता दिंडी नगरच्या बाजार समितीत दाखल होणार आहे. 16 जून पर्यंत दिंडी नगरमध्येच असणार आहे.
दिल्ली
– आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. यावेळी पीएम प्रणाम योजनेला मान्यता मिळू शकते. शेतीत फर्टिलायजर कमी प्रमाणात वापरण्यासंदर्भातली ही योजना आहे. फर्टिलायजर कमी वापरणाऱ्या राज्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे, सकाळी 10.30 वाजता.
- शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मागील काही दिवसांपासून भाजपसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार शिंदे कोणाची भेट घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोलापूर
- सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान चिमणी पाडण्याबाबत आज कार्यवाही सुरू केली जाणार आहे. यासाठी रात्री 12 पासून ते 18 जून पर्यंत सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनास बंदी घालण्यात आली आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
मुंबई
- विदर्भातील चार लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांनी आज मुंबईत बैठक बोलावली आहे. यात वर्धा, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि अमरावती या लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार चर्चा करणार आहेत.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि उत्तम निरोगी आरोग्य लाभो यासाठी गणेश मंदिरात महायज्ञ करण्यात येणार आहे.
- एसटी महामंडळाचा वर्धापन सोहळा आज वाय बी चव्हाण सेंटरला पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे.
- शहरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांची श्रवणशक्ती देखील कमी होत आहे. त्यामुळे आता ध्वनि प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून बुधवारी 14 जून रोजी नो हॉर्निंग डे साजरा केला जाणार आहे. संपूर्ण मुंबई शहरात एक दिवस हे अभियान राबवले जाणार आहे. तर कोणी कर्कश आवाजात हॉर्न वाजवत राहील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- मुंबई काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा वर्षा एकनाथ गायकवाड आज पदभार स्विकारणार आहेत.
- समीर वानखेडे यांच्याशी संबंधित सीबीआयच्या प्रकरणातील सहआरोपी सॅम डिसूझाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज होणार फैसला.
- दापोलीचं साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी.
- हसन मुश्रीफ यांची तिन्ही मुलं, साजिद, आबीद आणी नाविद यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी.
सिंधुदुर्ग
- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली ओसरगाव टोल नाका आजपासून सुरू करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाला खेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे.
शिर्डी
- राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांची भाजपचे विवेक कोल्हे यांच्या समवेत जाहीर सभा होणार आहे. गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सभेच आयोजन करण्यात आले आहे. कारखाना निवडणुकीत विखे यांच्या विरोधात भाजप काँग्रेस युती झाली आहे.
नाशिक
- भाजप नेते आशिष शेलार आज नाशिकला येणार आहेत. शहरातील बुद्धिजीवीशी संवाद साधणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं डॉक्टर, सीए वकील, बिल्डर्स यांच्या पर्यंत पोहचविण्याचा हेतू आहे.
- जिल्हा बँकेच्या वसुली मोहिमेच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. मात्र त्याचीही दखल घेतली नसल्यानं मोर्चा काढण्याचा निर्णय.
परभणी
- पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जयंती उत्सव सोहळा परभणीच्या जिंतूर शहरात आयोजित करण्यात आला आहे. याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर उपस्थिती असणार आहे.
बुलढाणा
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस असल्याने जिल्हा मनसेकडून शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात वाढदिवसानिमित्त विशेष आरती आणि अभिषेक करून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
वर्धा
- कारंजा घाडगे येथे भारत राष्ट्र समितीच्या वतीने शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी शेतकऱ्यांना बियाणे देखील वितरित केले जाणार आहे. तेलंगणा राज्यातील माजी जल आणि पर्यावरण मंत्री जोगु रामन्ना उपस्थित असणार आहेत.
चंद्रपूर
- दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज चंद्रपूर शहरात संवाद प्रतिष्ठान या संस्थेकडून सभेचे आयोजन करण्यात आले आहे.