14th January Headlines : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. शिवाय आज भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा फायनल थरार
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. पुण्यात सुरु असलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातील अंतीम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापुरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोन अंतीम लढतींमधील विजेते महाराष्ट्र केसरीच्या अंतीम लढतीत खेळणार आहेत. शनिवारी संध्याकाळी आधी अनुक्रमे मॅट आणि माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येतील आणि यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल. नांदेडचा शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जातोय. दुखापतीतून सावरत शिवराजने मॅट विभागाची अंतीम लढत गाठलीय. इथे त्याची लढत 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्याशी होणार आहे.
औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार दिन
आज औरंगाबाद विद्यापीठ नामविस्तार दिन आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक आणि नेते उपस्थित असतात. या निमित्ताने आज महाविकास आघाडीकडून एक सभा घेतली जाणार आहे. त्यासाठी कॉंग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते अंबादास दानवे, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, नितीन राऊत, चंद्रकांत हांडोरे, सुषमा अंधारे , रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
पंढरपुरात भीगीनिमित्त रूक्मिणी मातेला भोगी करणार
आज भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा दुसरा दिवस
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रेतील दुसरा महत्वाचा दिवस. दुसऱ्या दिवशी यात्रेतील विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
हरियाणाच्या पानिपतमध्ये मराठ्यांचा जागर
हरियाणाच्या पानिपतमध्ये मराठ्यांचा आज जागर होणार आहे. या निमित्ताते तेथ शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलंय.
ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचा महारोजगार मेळावा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने महारोजगार मेळाव्याचे आयोज केले आहे. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, राजन विचारे, वरुण सरदेसाई उपस्थित राहणार आहे.-
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज नवीमुंबईच्या दौऱ्यावर असतील. आजच्या आदित्य ठाकरेच्या दौऱ्याची सुरवात ऐरोली टोल नाक्यावरुन होईल. यावेळी आदित्य ठाकरे ऐरोली मतदार संघातील सर्व शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि नेत्यांची भेट घेणार आहेत.
पंढरपुरात पहिल्या शेतकरी वजन काट्याचे उद्घाटन
साखर कारखानदारांकडून ऊस वजनात काटा मारण्याच्या तक्रारी नंतर आज राज्यातील पहिल्या शेतकरी वजन काट्याचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या हस्ते होणार आहे. हा शेतकरी वजन काटा शेतकऱ्यांसाठी तयार केलाय.