सोमवार ठरला घातवार, तीन अपघातांमध्ये 14 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2018 10:32 PM (IST)
भंडारा जिल्ह्यातील अपघातात सात जणांचा, तर रायगड जिल्ह्यातील दोन अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : सोमवार घातवार ठरला आहे. दिवसभरात विविध ठिकाणी तीन अपघातांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील अपघातात सात जणांचा, तर रायगड जिल्ह्यातील दोन अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सहावर भीषण अपघात झाला. रस्त्याने येणाऱ्या भरधाव कंटेनरने रस्त्यावरील दहा ते पंधरा जणांना चिरडलं. ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे रायगड जिल्ह्यात दोन अपघात झाले. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. धरणाचीवाडीजवळ दुचाकी आणि पिकअप जीपची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. दुसरा अपघात पनवेलजवळ झाला. मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईकडे येणाऱ्या ओमनी आणि टेम्पोमध्ये धडक झाली, ज्यामध्ये पाच जणांनी आपला जीव गमावला.