नागपूर : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या चर्चासत्रात शिवसैनिक आणि विदर्भवादी कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पहिल्या प्रश्नावरच हा गोंधळ झाल्याने पुढील चर्चासत्रच उधळले गेले.
ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने त्यातील एका प्रकरणावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. वेगळा विदर्भ असा चर्चेचा विषय होता. चर्चासत्रात वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आणि विरोधातील अनेक दिग्गज मंडळी होती.
श्रीहरी अणे, शिवसेना खासदार आनंदराव अडसुळ, विजय दर्डा, गिरीश गांधी, वि. स. जोग, माजी खासदार अविनाश पांडे हे या चर्चेत सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे सूत्रसंचलन एबीपी माझाच्या पत्रकार सरिता कौशिक या करत होत्या.
विदर्भ राज्याची संकल्पना म्हणजे कल्पनाविलास आहे का?, या पहिल्या प्रश्नावरुनच चर्चासत्रात गोंधळ सुरु झाला. या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीहरी अणेंनी लोकांना विदर्भासाठी हात वरती करायला सांगितले आणि गोंधळास सुरुवात झाली.
धक्कादायक म्हणजे, राज्याचे माजी पोलिस महासंचालक पीकेबी चक्रावर्ती हे स्वतः शिवसैनकांशी भिडले. अडसुळ, अणे यांनी लोकांना शांत केले. त्यानंतर शांत झालेल्या चर्चासत्र पुन्हा अडसुळांच्या एका उत्तरावरुनही गोंधळ सुरु झाला. अखेर श्रीहरी अणे, गिरीश गांधी आणि विजय दर्डा हे चर्चासत्राचे हॉल सोडून निघून गेले.