13th July In History: आजचा दिवस इतिहासाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असलेली पावनखिंडीची लढाईदेखील आजच्या दिवशी झाली. या लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळे यांनी प्राणांची आहुती दिली. तर, मुंबईत आजच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. तर, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतीदिन आहे. 


1660: पावनखिंडीतील घनघोर युद्धाला सुरुवात, बाजीप्रभू देशपांडे यांना हौतात्म्य 


छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करताना सगळ्यांनीच त्यांना साथ दिली. मराठी मुलुखातील अठरापगड जातीतील लोकांनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली. स्वराज्य स्थापनेतील एक महत्त्वाचे युद्ध म्हणजे घोडखिंड अर्थात पावनखिंडीतील लढाई. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर पन्हाळा किल्ल्यापर्यंत सर्व मुलुख जिंकुन घेतला. त्यावेळी त्यांना तोंड देण्यासाठी आदिलशहाने सिद्धी जौहर या सरदाराची नेमणुक केली. त्याच्यासोबत अफजलखानाचा मुलगा फाजलखान हा सरदार दिला. सिद्दी जौहर चाळीस हजारांची फौज घेऊन पन्हाळ्याच्या पायथ्याशी आला. त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळा किल्यावर होते. सिद्दीने किल्याला वेढा घातला. सलग चार महिने उन्हापावसाची तमा न करता वेढा चालु होता. सिद्दीने सोबत आणलेल्या तोफांचा मारा किल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचत नव्हता म्हणून त्याने राजापुरच्या इंग्रजांकडून लांब पल्याच्या तोफा मागवून त्यांचा मारा किल्यावर केला. शेवटी गडावरची शिबंदी संपत आली.


शिवाजी राजेंनी जिद्दी जौहरच्या हातावर तुरी देऊन गडावरून निसटुन जायचा बेत केला. त्याकरिता शिवा काशिद या शिवाजी राजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने महाराजांचा वेश परिधान करून सिद्दीच्या गोटात जाऊन त्याची दिशाभुल केली. तेवढ्या काळात महाराज पन्हाळ्यावरून सुखरूप निसटले. 600 बांदल मावळ्यांसह शिवाजी महाराजांनी विशाळगडाकडे कूच केली. शिवाजी महाराजांनी गजापूरची खिंड गाठली. बाजीप्रभूंनी शिवरायांना 300 सैनिक घेऊन पुढे जायला सांगितले. त्यावर शिवरायांनी इथपर्यंत आलो, जे काय होईल ते इथेच होईल असं म्हणत लढण्याचा निर्धार केला. जड पावलांनी, नाईलाजाने शिवाजी महाराजांनी 300 मावळ्यांसह विशाळगडाकडे कूच केली. 


पावनखिंड येथे 300 मावळे आणि सिद्दी जौहरचे जवळपास 3000 हून अधिक सैन्य आमने सामने आले. या खिंडीत एक-एक मावळा हा भक्कमपणे उभा राहून गनिमांना थोपवून धरत होता. जवळपास 18 तास बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळे यांनी खिंड झुंजवत ठेवली. अखेर बाजीप्रभु देशपांडे आणि बांदल मावळे धारातीर्थ पडले. विशाळगडावर महाराज सुखरूप पोहचल्यानंतर बाजीप्रभूंनी देह ठेवला. 



1929: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. 


जतिंद्रनाथ हे जतीन दास म्हणून ओळखले जात असे. भगत सिंह, चंद्रशेखर आझाद यांच्या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे क्रांतीकारक होते. लाहोर कट खटल्यात त्यांना अटक झाली होती. भगत सिंह आणि इतर सहकारी क्रांतिकारकांनी सुरू केलेल्या उपोषणात त्यांनी सहभाग घेतला. भारतीय राजकीय कैद्यांना युरोपीयन कैद्यांप्रमाणे समान वागणूक, अन्नाचा दर्जा आदी विविध मागण्यांसाठी  उपोषण सुरू करण्यात आले. सलग 63 दिवस हे उपोषण सुरू होते. या उपोषणात त्यांचे वयाच्या 24 व्या वर्षी 13 सप्टेंबर 1929 रोजी निधन झाले. 



2000:   साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन


इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. 1950 च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. 


गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मृगजळ, मेंदी, रंगबावरी, शेला आदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. तर, कदली, चैतू, श्यामली आदी कथासंग्रह आहेत. इंदिरा संत यांना साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य कला अकादमी पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे. 



2009: ज्येष्ठ अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते निळू फुले यांचे निधन 


मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे निधन आजच्या दिवशी झाले. 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत सक्रियपणे काम केलेले आहे. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आले.


नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला.


निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सलग 40 वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी 12 हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास 140 चित्रपटांमधून काम केले. 'सामना' चित्रपटातील हिंदूराव पाटील, सिंहासन चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस, सखाराम बाईंडर या नाटकातील सखाराम बाईंडर या त्यांनी साकारलेल्या भूमिका अजरामर ठरल्या. निळू फुले यांनी साकारलेल्या विनोदी व्यक्तिरेखाही लोकांच्या पसंतीस उतरल्या.


रुपेरी पडद्यावर निळूभाऊ खलनायकी भूमिका साकारत असले तरी प्रत्यक्ष जीवनात त्यांनी केलेले काम हे नायकासारखे आहे. नाट्य रसिक आणि सिने प्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळू भाऊ समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केलेली आहे. ते समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होते. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 



2011: मुंबईत तीन साखळी बॉम्बस्फोट


मुंबईमध्ये सायंकाळच्या सुमारास लागोपाठ तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या बॉम्बस्फोटात 26 ठार आणि 130 जण जखमी झाले होते. 


दादर येथील डिसिल्व्हा हायस्कूल आणि गोल हनुमान मंदिराजवळील बेस्ट बस थांब्याच्या मीटर बॉक्समध्ये संध्याकाळी पावणे सात वाजता बॉम्बस्फोट झाला. सुदैवाने काही वेळेपूर्वीच शाळेची मुले या ठिकाणाहून गेली होती. तर, झवेरी बाजार येथील खाऊ गल्लीतही संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. येथे एका छत्रीमध्ये हा बाँब लपवून ठेवण्यात आला होता. हिरे व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या ऑपेरा हाऊस येथील प्रसाद चेंबर इमारतीजवळील बस स्टॉपजवळ तिसरा बाँबस्फोट झाला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


1793: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.


1969: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)


1994: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे यांचे निधन