12th June Headlines : महाराष्ट्रात खळबळ उडून देणाऱ्या बाल तस्करी प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून हे प्रकरण आता रेल्वे पोलिसांच्याच अंगलट येण्याची चिन्ह आहेत. रेल्वे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हाच चुकीचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असून आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. 


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता 
 


मुंबई – कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडी प्रकरणामध्ये दीपक गवळी पीए नाही तर कृषी अधिकारी असल्याचा म्हटलं होतं. परंतु अब्दुल सत्तार यांचंच एक डॉक्युमेंट सध्या व्हायरल झालं असून याच्यामध्ये दीपक गवळी पीए असल्याचा उल्लेख आहे. या संपूर्ण प्रकरणावरून सध्या विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत प्रकरणाचा प्रयत्न केला आहे. सकाळी 11 वाजता अजित पवार या विषयावर बोलण्याची शक्यता आहे. 


नाशिकच्या प्रकरणात नवा ट्विस्ट 


महाराष्ट्रात खळबळ उडून देणाऱ्या बाल तस्करी प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून हे प्रकरण आता रेल्वे पोलिसांच्याच अंगलट येण्याची चिन्ह आहेत. रेल्वे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हाच चुकीचा आहे, आरोपींनाही त्रास झाला, शासनाचे पैसे आणि वेळ वाया गेला असा आरोप करत याप्रकरणी पोलिसांविरोधात आरोपींचे वकील हायकोर्टात जाणार आहेत. तर नाशिकच्या बाल निरीक्षण गृहात ठेवलेल्या तीसही मुलांची सुटका होण्याची शक्यता आहे.


काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर 


काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांचा आजपासून दोन दिवसीय मुंबई दौरा आहे. दुपारी 4 वाजता गरवारे क्लबला कोर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसने घेतलेल्या जिल्हा निहाय लोकसभेचा आढावा याची चर्चा केली जाईल. आगामी निवडणुका संदर्भात रणनीती आणि महाविकास आघाडी संदर्भात चर्चा होईल. त्याच सोबत पक्षांच्या अंतर्गत घडामोडी वरती चर्चा होण्याची शक्यता आहे. 


राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक 


राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी बैठक आहे. या बैठकीत आयत्या वेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याच सोबत राज्यातील पाणी साठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. पाऊस लांबणीवर गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची अनेक ठिकाणी टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पाणी कपाती संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच बैठकीत मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर
 
'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री हे कोल्हापूर विमानतळावर येथील त्या ठिकाणाहून करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतील आणि त्यानंतर तपोवन इथल्या मैदानावर कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. कार्यक्रम झाल्यानंतर निवेदन स्वीकारले जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्र्यांना आपल्या मागणीचे निवेदन घेऊन भेटणार आहे. 
 
पालखी सोहळा


-  संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे मुक्कामी. पुणेकर, अनेक राजकीय नेते दर्शन घेणार आहे.


-  आळंदीत वारकरी आणि पोलीस यांच्यातील संघर्षानतर राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलनं करण्यात येणार आहेत.


मान्सून अपडेट 


राज्यात पुढील 3 दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र मान्सून पुढे सरकण्यासंदर्भात भारतीय हवामान विभागाकडून आज कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. पुढील तीन दिवसांनंतर राज्यात पावसाची शक्यता नाही. अशात मान्सूनला मराठवाडा आणि विदर्भ गाठण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.  


बारामतीत महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा 


महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे दौंड तालुक्यामध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा वाढते लोडशेडींग, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा तसेच नादुरुस्त रोहित्रांमुळे तालुक्यातील शेतकरी आणि व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात विजेच्या अनुषंगिक येणाऱ्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्युत वितरण कंपनी दौंड तालुक्यातील दापोडी येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 9 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. 


पंढरपूर


-  आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारती शोधून त्यावर कारवाईला नगरपालिकेकडे सुरुवात केली आहे.


-  आषाढी यात्रेसाठी वारकऱ्यांची ओळख असणाऱ्या तुळशी माळा बनवायला वेग आलाय.