सातारा : कोयना धरण परिसरात पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाणीचे दोन गंभीर प्रकार घडले आहेत. पहिल्या घटनेत नऊ पर्यटकांनी दोन पोलिसांना बेदम मारहाण केली तर दुसऱ्या घटनेत कोयना वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना चार पर्यटकांनी मारहाण केली.


काल 15 ऑगस्टच्या सुट्टीमुळे कोयना परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सुट्टीमुळे अनेक पर्यटकांना कोयना धरण पाहण्याचा पास मिळाला नाही. त्यामुळे काही पर्यटक पोलिसांना दमबाजी करून धरण परिसरात जाण्याचा प्रयत्न करत होते. कोयना परिसरात जबरदस्तीने घुसणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी जाण्यास मज्जाव केला. त्यावेळी संतापलेल्या नऊ पर्यटकांनी दोन पोलिसांना बेदम मारहाण केली. यात एक पोलिस कर्माचारी जखमी झाला आहे. मारहाण करणाऱ्या नऊ पर्यटकांना कोयाना पोलिसांनी अटक केली आहे. सागर काळभोर, सुरज काळभोर, सुरज भुजबळ, सुहम काळभोर, समिर काळभोर, सुभाष शेलार, विशाल शेलार, हर्षवर्धन भोसले, सचिन काटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.


तर दुसऱ्या घटनेत ओझर्डे धबधब्याजवळ जाऊ नका असे सांगितले म्हणून चार पर्यटकानी वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून यातील एक पर्यटक फरार झाला आहे. विक्रम साबळे, समिर साबळे, सुरज साबळे अशी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पर्यटकांची नावे आहेत, तर प्रमोद साबळे हा अरोपी पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे


या दोन्ही घटनेतील हुल्लडबाजी करणाऱ्या 13 अरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.