12 March Headlines : देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. याबरोबरच माकपच्या वतीने आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई विधानभवन असा शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च निघणार आहे. आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून दुपारी मार्चला सुरुवात होऊन नाशिक शहरात मुक्काम करणार आहेत.
देशभरात रंगपंचमीचा उत्साह
देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.
कोरोना निर्बंधमुक्तीनंतर आज नाशिकमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. रहाडिंमध्ये उडी घेत रंग खेळण्याची नाशिकची अनोखी परंपरा आहे.
साईंच्या शिर्डीत रंगपंचमी उत्सवाची धूम असमार आहे. देशभरातून साईभक्त करतात रंगांची उधळण करतील. संध्याकाळी 5 वाजता सुवर्ण रथाची मिरवणूक निघते.
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या हुडोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा 'हुडोत्सव सर्वांसाठी पर्वणीच असते. हा हुडा सागवानी लाकडाचा बनविण्यात आला आहे. घोडेमोडणी आणि वाघाची शिकार हे या हुडोत्सवाचे वेगळेपण आहे. कोलगांव, कुणकेरी, आंबेगावचं रोंबाट होळीच्या सातव्या दिवशी श्रीदेवी भावई, आवेगावचा श्रीदेव क्षेत्रपाल, कोलगांवचा श्रीदेव कलेश्वर हुडोत्सवात सहभागी होतात. तर तीन अवसार या हुड्यावर चढतात, यावेळी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अफाट गर्दीतून या अवसारावर दगड मारण्याची प्रथा आहे.
सोलापुरात आज रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळेल. लोधी समाजाचा पारंपारिक उत्सव असलेल्या रंगपंचमीचा रंगगाडा उत्सव आज साजरा होईल. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हा उत्सव साजरा झालेला नव्हता. यंदा मोठ्या उत्साहात लोधी समाज हा उत्सव साजरा करणार आहे. पारंपारिक पद्धतीने शंभर बैलगाड्यांवर रंगाचे आणि पाण्याचे बॅरल ठेवण्यात येतात. शहरातील विविध भागातून या बैलगाड्यांची मिरवणूक निघते. दुपारी 4 वाजता बालाजी मंदिर येथून या रंगगाड्या निघतील.
नाशिक ते मुंबई विधानभवन असा शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च
माकपच्या वतीने आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई विधानभवन असा शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च निघणार आहे. आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून दुपारी मार्चला सुरुवात होऊन नाशिक शहरात मुक्काम करणार आहेत. त्यानंतर सोमवारी सकाळी हा मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. अंदाजे 15 हजार शेतकरी यामध्ये सहभागी होतील असा अंदाज. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत किमान आधार भाव दोन हजार रूपये निश्चित करून लाल कांद्याला 500 ते 600 रूपये अनुदान जाहिर करून कांदा निर्यातीचे धोरण जाहीर करावे अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.
वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रा
महाराष्ट्रातील सर्वात मोठं बगाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. या बगाड यात्रेला लाखो भाविक हजेरी लावत असतात.
गोरेगाव येथे आदित्य ठाकरेंची सभा
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिव गर्जना सभा आहे. गोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात संध्याकाळी 7.30 वाजता ही सभा पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मांड्या आणि हुबळी धारवाडच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदी 16 हजार कोटींच्या योजनांचं उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत. दुपारी 12 वाजल्यापासून मोदी कर्नाटकात असणार आहेत.
अझीम प्रेमजी यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान होणार
सन 2022 चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी असणारे दानशूर, परोपकारी अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित रहाणार आहेत.