लातूर : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वाढीव भूसंपादन न करताच होणाऱ्या लातूर-जहिराबाद या 752 के राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याप्रकरणी 12 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. जामीन घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्यानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महामार्गाचं काम अडवणाऱ्या 25 शेतकऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करत 12 शेतकऱ्यांना अटक केली. मात्र आता अटक केलेल्या शेतकऱ्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्यानं या शेतकऱ्यांचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लातूर-जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाचं सध्या सुरु आहे. पहिल्या टप्यात निलंगा ते औराद शहाजानी रस्त्यावर गेली अनेक दिवसांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात आमची शेती अधिग्रहण न करता त्यावर रुंदीकरणाचे काम केले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू असलेले काम बंद पाडले.

शेतकऱ्यांनी काम बंद पाडल्यानं महामार्गाचं काम करणाऱ्या संबंधीत कंपनीच्या प्रतिनीधीने औराद पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर 25 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करुन 12 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.