11th May In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारताने राजस्थानमधील पोखरणमध्ये पुन्हा एकदा अणू चाचणी घेतली. 11 मे आणि 13 मे 1998 रोजी अणुचाचणी घेतली. या दोन दिवसात एकूण पाच अणुचाचण्या घेण्यात आल्या. अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1857 च्या बंडात भारतीयांनी दिल्ली ताब्यात घेतली होती.  संवेदनशील, प्रतिभाशाली उर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांचा आज जन्म दिवस आहे. एक नजर इतिहासातील प्रमुख घडामोडींवर...


1857 : 1857 च्या उठावात भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली


1857 च्या उठावास भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध देखील म्हटले जाते. ब्रिटिश सैन्यात नव्याने आलेल्या काडतूसांच्या मुद्यावरून ब्रिटीश सैन्यातील हिंदू-मुस्लिम जवानांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या काडतूसाच्या मुद्यावरुन 1857 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत डमडम आणि बराकपूर जवानांनी आक्रमकता दाखवली होती. मीरत येथील शिपायांनी नवी काडतुसे वापरण्याचे नाकारल्यामुळे त्यांना कैद केले गेले. शिपायांनी सरकारी इमारती जाळण्यास सुरुवात केली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे आणि इंग्रज अधिकारी ह्यांच्यात चकमक झाली. मंगल पांडे यास पकडून 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आले. येथूनच उठावास सुरुवात झाली. अनेक ठिकाणच्या बंडखोर फौजांनी ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले प्रदेश ताब्यात घेतले. मीरतहून आलेली फौज दिल्लीत प्रवेश करताच येथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई बंडखोर फौजांना येऊन मिळाले. मोगल बादशहाचे साम्राज्य इंग्रजांनी खालसा केले होते.  भारतीयांच्या मनात त्या वैभवशाली साम्राज्यांच्या आठवणी अजून जाग्या होत्या. त्यामुळे बंडखोरांनी उठावाच्या नेतृत्वाची धुरा बादशहा बहादूरशहाकडे सोपवली. 11मे 1857 रोजी बंडखोर फौजांनी आपल्या दिल्लीतील आगमनाबरोबर दिल्लीतील इंग्रजांच्या कत्तलीस सुरुवात केली. बंडवाल्यांच्या आक्रमकतेपुढे ब्रिटिश नामोहरम झाले. उठाववाल्यांनी दिल्लीतील दारुगोळयाच्या कोठाराकडे धाव घेतली पुढील धोका ओळखून ब्रिटिश शिपायांनी कोठारास आग लावली. प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. अवघ्या 24 तासात दिल्ली बंडखोर भारतीय फौजांच्या ताब्यात आली. बादशहा बहादूरशहा यांस भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर पुढे सप्टेंबर महिन्यात ब्रिटिशांनी पुन्हा एकदा दिल्लीत ताब्यात घेतली. बहादूरशहा जफर यांना कैद करून कोठडीत डांबले.


1888 : ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.


मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी 'महात्मा' ही पदवी दिली. 


महात्मा फुले यांनी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली होती. त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करुन पुण्यातील भिडे वाडा येथे शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे समाजसुधारणेच्या कार्यात अग्रभागी असेल तरी त्यांनी व्यावसायिक म्हणूनदेखील मोठे यश मिळवले होते.  यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून महात्मा फुले यांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली.


क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी', 'ब्राह्मणाचे कसब' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकत निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी समजले जातात. 


बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप विधवाविवाह पुनर्विवाह, शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड, आदी कार्येदेखील त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी पोवाड्याचे लेखन केले होते. 


1912: संवेदनशील उर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांचा जन्म


संवेदनशील, प्रतिभाशाली उर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांचा जन्म 11 मे रोजी समराला-लुधियाना येथे झाला. अडीचशे पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्रे, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख व निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातील संघर्ष, जाणिवा यांचे उघडपणे दर्शन होते. भारत-पाकिस्तान दरम्यान झालेली फाळणी ही त्यांच्या आयुष्यातील भळभळती जखम होती. दोन्ही देशांतील दंगली, जाळपोळ, हिंसा, धर्मांधतेने व्यथित केले. या काळातील वेदनामय घटना त्यांनी कथांमधून व्यक्त केल्या आहेत. समाजातील घटनांचे सत्य आणि विद्रूप त्यांनी निर्भीडपणे मांडले. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्ऱ्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. आपल्या 42 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण 22 कथासंग्रह, एक कादंबरी व इतर साहित्य लिहिले. भारताच्या फाळणीनंतर मंटो जानेवारीमध्ये मुंबई सोडून लाहोरला गेले. मंटोच्या आयुष्याची अंतिम वर्षे त्यांच्यासाठी आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने हलाखीची होती, परंतु त्यांचे सर्वोत्कृष्ट लिखाण याच काळात झाले. 


1950 :  अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 


गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांचा आज जन्मदिवस. सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले होते. मराठी, हिंदी, ओरिया, हरियाणवी, भोजपुरी, बंगाली, गुजराती आदी चित्रपटांत त्यांनी काम केले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी 'पेटलेली अमावास्या' या एकांकितेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती. सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी 'लग्नाची बेडी' या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते.


श्याम बेनेगल यांच्या 'भारत एक खोज' या मालिकेत त्यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली होती. समांतर आणि व्यावसायिक चित्रपटातही ते कमालीचे यशस्वी झाले होते. सडक या हिंदी चित्रपटात केलेल्या महाराणी या तृतीयपंथी खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला होता. 


1998: भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली


पोखरण 2 हे भारताने 11 मे आणि 13 मे 1998 मध्ये केलेल्या अणुचाचण्यांना दिले गेलेले नाव आहे. या दोन दिवसात मिळून एकूण पाच अणुचाचण्या केल्या. 11 मे रोजी तीन तर 13 मे रोजी दोन अशा एकूण पाच अणुचाचण्या करण्यात आल्या होत्या. यातील पहिला स्फोट फ्युजन बॉम्ब होता तर इतर फिजन बॉम्ब होते. 1974 मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केल्यानंतरची दुसरी अणुचाचणी होती. दुसऱ्या अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. 1999 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. 


इतर महत्त्वाच्या घडामोडी:


1867: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.


1889: कॅडबरी कंपनी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन


1904: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म


1946: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म


1949: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.