आंबेडकर आडनावाचा किती फायदा झाला, याबाबत विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, "मी ज्या शाळेत वाढलो तोपर्यंत फक्त मुख्याध्यापक आणि दोन तीन शिक्षक सोडले तर मी कोण आहे हे कोणालाच माहित नव्हतं. माझी सर्वसामान्य मुलांप्रमाणे वाढ व्हायची असेल तर मी कोण आहे हे लपवून ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं. ते जर लपलं नसतं तर त्या वयातील मुलांमध्ये जो खोडसाळपणा असतो, खेळकरपणा असतो तो येणार नाही, अशी भीती होती. शिवाय शिक्षकही पॅम्परिंग करायला सुरुवात करतील म्हणून मला मुख्याध्यापक आणि घरातून बिनधास्तपणे वागण्याची मुभा मिळाली. ती मुभा कायम ठेवली आणि सुजातलाही दिली. कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी कोण आहे, हे कोणालाच माहित नव्हतं. मी माझ्या टोपणनावाने ओळखलो जायचो. त्यावेळी माझं टोपणनाव बॉबी होतं. शाळेतून बाहेर पडल्यानंतर आमच्या मित्रांची पार्टी झाली तेव्हा सगळ्यांना समजलं की मी कोण आहे. तोपर्यंत माझं आयुष्य नॉर्मल होतं. सुजातलाही नॉर्मल लाईफ होती. एका सरांनी एक्स्ट्राप्रोटेक्टिव्हनेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी आणि अंजली सरांशी जाऊन बोललो आणि त्याला नॉर्मल आयुष्य जगू द्या. त्यामुळे त्याचंही नॉर्मल आयुष्य होतं."


जातीभेद हा 15-20 वर्षात डायल्यूट होणारा विषय


जातीअंताबाबत बाबासाहेब आणि महात्मा फुले यांनी सुरु केलेली प्रक्रिया आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या 15-20 वर्षात डायल्यूट होऊन जाणारा हा विषय असेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


आरक्षणाचा उपयोग होतो की राजकारण होतं?


आरक्षण हे राहणार. आरक्षणाच्या मुद्द्याकडे ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांशिवाय इतर कोणीही आरक्षणाला त्यांच्या राज्यव्यवस्थेत जागाच दिली नाही. देशाचा गुलामीचा इतिहास पाहिला तर असे प्रसंग सापडतात की बाहेरच्यांनी आपल्याला हरवण्यापेक्षा आतल्यांनी माहिती दिल्यामुळे आपण हरलो. याला सामाजिक अर्थ आहे. तुम्ही जर आम्हाला विचारत नसाल तर राज्य कोणाचं आहे याच्याशी संबंध नाही. आरक्षण हे विकासात्मक आहे असा कोणी विचार करु नये, असं माझं म्हणणं आहे. आरक्षण हे व्यवस्थेमध्ये शाश्वतपणा यावा म्हणून तुमचाही प्रतिनिधी आहे, एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. 100 टक्के जरी आरक्षण दिलं तरी प्रत्येकाला शाश्वत करु शकतो असं नाही.


जातीअंत हा केवळ आम्हा दोघांचा नाही तर मानवतावादी मुद्दा : सुजात आंबेडकर


बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळालेली परंपरा फार मोठी आहे. लहानपणापासून घरात झालेली चर्चा, घरचं वातावरण, आई-बाबांसोबत गेलेल्या दौऱ्यातील वातावरण, चैत्यभूमीवर दरवर्षी जाणं या वेगवेगळ्या गोष्टींमुळे जाणीव झाली. शिक्षण, वाचन, वेगवेगळ्या लोकांसोबत झालेल्या चर्चेतून त्याला आकार मिळाला, असं सुजात आंबेडकर म्हणाला. 


बेरोजगारी हा आपल्यासमोर प्रमुख मुद्दा असल्याचं सुजात आंबेडकरने सांगितलं. "तरुणांना शिक्षणाचं महत्त्व पटलं आहे. ते उच्च आणि दर्जेदार शिक्षण घेत आहेत, पण नोकऱ्या उपलब्ध नाहीत. हा मुख्य मुद्दा आहे. भारत सरकारचं आर्थिक धोरण सुरु आहे, त्यांच्या भाषेतील  फ्री मार्केट इकॉनॉमी अंबानी आणि अदानी यांच्यामुळे खरंच फ्री आहे का? कॉम्पिटिशन फ्री आहे का? या अडचणी बहुजन उद्योजकांसमोरही आहे, असं तो म्हणाला. तसंच आर्थिक प्रश्न आणि जातीचा प्रश्न हातात हात धरुन चालतात. जातीअंताचा लढा हा फक्त आमच्या दोघांचा मुद्दा नाही. तो मानवतावादी मुद्दा आहे. ज्या कोणाला माणुसकी आहे त्याने जातीअंतासाठी उभं राहिलं पाहिजे, असं आमचं ठाम मत आहे. समान समाजव्यवस्था हवी असेल तर जातीअंताला पर्याय नाही, असंही सुजातने नमूद केलं.


2024 पर्यंत काय होणार हे फक्त मोदी आणि शाह ठरवतील : प्रकाश आंबेडकर


2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील, एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शाह. या दोघांना वाटलं की या राज्यात कमी आमदार येत आहेत तर त्या राज्यातूल राजकीय पक्ष संपवण्याची प्रक्रिया सुरु होईल. कोल्हापूरला असताना अमित शाह यांनी सांगितलं की 48 पैकी 48 जागा घेणार. हे त्यांचं राजकीय वक्तव्य नव्हतं. ते कोणतंही वक्तव्य करायचं म्हणून करत नाहीत. त्यामागे काय मिळवायचं, कसं मिळवायचं हे ठरलेलं आहे. त्यामुळे त्याचं वक्तव्य हलक्यात घ्यायला नको. महाराष्ट्रातली स्ट्रेटेजी त्यांनी सुरु केली आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण


आज एबीपी माझाचा कट्टा झालाय अकरा वर्षांचा. हा प्रवास सोपा नव्हता. तो केवळ तुमच्या साथीनं शक्य झाला आहे. आज एबीपी माझाचा महाकट्टा पार पडणार आहे. एबीपी माझावर दिवसभर तुम्हाला महाकट्टा लाईव्ह पाहता येणार आहे. एबीपी माझावर दिवसभर अनेक मान्यवरांची मांदियाळी असणार आहे.