मुंबई : धुळे-उस्मानाबाद रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पुलावरुन कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा तर अहमदनगरमध्ये शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला निघालेल्या चार भाविकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातून काही मजूर उस्मानाबादकडे येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. धुळे-उस्मानाबाद रस्त्यावरुन या मजुरांची पिकअप गाडी विंचूर गावाजवळील बोरी नदी पुलावरुन खाली पाण्यात कोसळली. यामध्ये गाडीतील सात जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी आहेत. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला, तीन लहान मुले, दोन लहान मुलींचा समावेश आहे.


तर दुसरीकडे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील साई भक्तांवर काळाने घाला घातला. औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर साई भक्तांच्या कारला अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. आकाश शीलवनत, अमोल गवळकर,आकाश मोरे आणि दत्ता डांगे अशी मृतांची नावं आहेत. किरण संजय गिरी आणि संतोष राऊत गंभीर जखमी आहेत.


अपघातातील जखमींवर शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालना तालुक्यातील शेवली येथून शुक्रवारी रात्री नऊ वाजता सर्व मित्र कारने साईदर्शनासाठी शिर्डीला निघाले होते. औरंगाबाद-नगर महामार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार थेट झाडावर आदळली. मध्यरात्री रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास साऊथसिटी जवळ हा भीषण अपघात झाला. घटनेमुळे शेवली गावावर शोककळा पसरली आहे.