मुंबई : महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी अखेर पार पडली. या बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास झाले आहे. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केलं. तर चार सदस्य तटस्थ राहिले. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.


विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडली. कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा हंगामी अध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय झाला. त्यानंतर मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. सभागृह सुरु झाल्या झाल्या भाजप सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

भाजप सदस्यांनी हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरुन वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केला. या गोंधळात बहुमताचा प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. या प्रस्तावाला नवाब मलिक आणि सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. यानंतर हेड काऊंट द्वारे मतमोजणी करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 169 तर विरोधात शून्य मतं मिळाली. बहुमताच्या चाचणीवेळी भाजपकडून विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावर बहिष्कार घातला. सर्व भाजप आमदारांनी सभात्याग केला.

 अधिवेशन कायदेशीर- अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

या सभागृहात अधिवेशन बोलवलं, अधिवेशन संस्थगित झाली. सात दिवसाच्या आत सभागृह बोलवत येतं.  त्यामुळे राज्यपालांनी शपथविधी झाला तेव्हा बैठक झाली. काल राज्यपालांनी परवानगी अधिवेशन दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे, असे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच तुमचा मुद्दा फेटाळून लावतो, असे त्यांनी सांगितले. यानंतर भाजपचे सदस्य वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केला. दादागिरी नहीं चलेगी, यासारख्या घोषणा देत भाजप सदस्यांनी गदारोळ केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचा परिचय करुन दिला.

 नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू -  देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी पुन्हा आक्षेप घेत मला संविधानाने बोलण्याचा अधिकार आहे, मला कोणी रोखू शकणार नाही, असे ते म्हणाले.  नियमानुसार जर शपथ घेतली नाही तरच ती ग्राह्य मानली जात नाही.  ओबामा ह्यांनी चुकीची शपथ घेतली म्हणून दुसऱ्या दिवशी घ्यावी लागली.  संविधानानुसार शपथ घेतली नाही म्हणून परिचय करून देणे योग्य नाही, असे ते म्हणाले. प्रोटेम स्पीकर निवडीबाबत आक्षेप घेत ते म्हणाले की, तुम्ही सांगता हे नवीन अधिवेशन नाही, जुने नाही. देशाच्या इतिहासात प्रोटेम स्पीकर बदलला नाही, असे त्यांनी सांगितलं. एक हंगामी अध्यक्ष  हटवून दुसरा  हंगामी अध्यक्ष  नेमण्यात आला.  सगळ्या गोष्टींची पायमल्ली होते आहे.  महाराष्ट्र विधान सभा इतिहासात हंगामी अध्यक्षांनी बहुमताचा प्रस्ताव मांडलेला नाही. हंगामी अध्यक्ष निवडणूक झाल्याशिवाय बहुमत प्रस्ताव येत नाही, असेही फडणवीस म्हणाले.  नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू, असल्याचं ते म्हणाले.

राज्यपालांनी ऑर्डर काढली - अध्यक्ष

यावर अध्यक्ष म्हणाले की, मंत्र्याच्या शपथेबद्दल बद्दल जे मुद्दे उपस्थित केले, शपथविधी सभागृहात झाला नाही. याचा संबंध राज्यपालांच्या कार्यालयाशी आहे. मी भाष्य करणार नाही. हंगामी अध्यक्ष प्रोटेम स्पीकर नेमण्याचे अधिकार कॅबिनेटला आहेत. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यपालांनी ऑर्डर काढली, असे अध्यक्षांनी सांगितलं.



दरम्यान उद्या (1 डिसेंबर) रविवारीही विधानसभा सुरु राहणार असून या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम :
* विधानसभा अध्यक्षांची निवड 1 डिसेंबरला सकाळी 11 वाजता
* विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत आहे
* नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत
* नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 1 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल (29 नोव्हेंबर) मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. उद्धव ठाकरे पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच मंत्रालय परिसरात लगबग सुरु होती. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. मंत्रालयात या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होतं. तसंच उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

मागील दहा दिवसातील नाट्यमय घडामोडी!
राज्यात 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपने शिवसेनेसोबत युती करुन निवडणूक लढवली होती. परंतु निकालानंतर मुख्यमंत्रीपदावर दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं. यादरम्यान राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला आमंत्रण दिलं. परंतु बहुमताचा आकडा नसल्याने सत्ता स्थापन करण्यात असमर्थ असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही आमंत्रण दिलं. मात्र त्यांनाही बहुमत सिद्ध करता आलं नाही. 22 नोव्हेंबर रोजी रात्री महाविकासआघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून एकमताने निवड झाली. परंतु रात्रीच अशा नाट्यमय घडामोडी घडल्या की 23 नोव्हेंबरच्या भल्या सकाळी अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सगळ्यांना धक्का दिला. मात्र पुढील तीन दिवसांत अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आलं आणि 26 नोव्हेंबर रोजी अजित पवारांनी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आलं. परिणामी देवेंद्र फडणवीसांनीही राजीनामा दिला आणि 80 तासांच्या आतच फडणवीस सरकार कोसळलं.