मुंबई : दरवर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेतली जाते. ही चाचणी आता मोबाईल अ‍ॅपद्वारे घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक काढून कलमापन चाचणीची माहिती देण्यात आली आहे. ही चाचणी महाराष्ट्र विद्याप्राधिकरण, पुणे आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या वतीने घेतली जाते.


दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा उच्च शिक्षणासाठीचा कल ओळखता यावा, यासाठी ही कलमापन चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जात होती. परंतु ही कलमापन चाचणी 2019 पासून महाकरिअर मोबाइल अ‍ॅपद्वारे घेतली जाणार आहे. यासाठी विभागीय स्थरावर जिल्ह्यात, तालुक्यात शिक्षकांना या अँड्रॉइड अ‍ॅपबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सदर परीक्षा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शाळेतच मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबधित सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे मोबाइल नंबर, ओटीपी कोड, ऑथेंटिकेशन या सर्वांची माहिती देणे यासाठी आवश्यक असणार आहे