सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आजपासून जिल्ह्यात 10 दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी या जनता कर्फ्यूला विरोध केला आहे. मात्र रस्त्यावरील फळे, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद करण्यात येणार असून आठवडी बाजारही बंद केले आहेत.


जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि आयुक्तांनी महापालिकेत व्यापारी संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक संघटनांनी जनता कर्फ्यूला विरोध केला. तर अनेकांनी बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र भाजीपाला विक्रेते, फेरीवाला संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. हा जनता कर्फ्यू करुन कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.


सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात तब्बल 1174 कोरोना रुग्णांची भर पडली. तर जिल्ह्यात काल 27 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे सांगलीतील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 762 वर पोहोचला आहे.