धुळे : नगरसेवकांना महानगर पालिकेत कचऱ्याची किंमत नाही, महानगरपालिकेचं प्रशासन बहिरं आहे, असं म्हणतं धुळे महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपचे शीतल नवले, सुरेखा चंद्रकांत उगले या सत्ताधारी भाजपच्याच नगसेवकांनी महानगर पालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिलाय. मनपा प्रशासनावर केलेले आरोप चुकीचे सिद्ध झाल्यास महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावरच फाशी घेईल असं आव्हान देखील नगरसेवक शीतल नवले यांनी मनपा प्रशासनाला दिलंय. आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांची महापौर चंद्रकांत सोनार यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना फारसे यश आलं नाही .


धुळे शहरातील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती साठी सव्वा कोटीची आवशकता आहे. मात्र हा निधी देखील मनपा प्रशासन देऊ शकत नाही. शहरातील स्वच्छता, शौचालय, पाणीपुरवठा यावर उपाययोजना करण्यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यांकडे दुर्लक्ष झालंय. नियमांचे उल्लंघन करून ठेकेदारांची बिलं काढण्यात आली आहेत. यासर्व प्रकरणात धुळे शहराचे एमआयएम चे आमदार डॉ.फारुख शहा हे देखील मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक शीतल मोहन नवले यांनी केला .


महानगरपालिकेच्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना देखील या प्रकरणी लक्ष केलं. मात्र महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता साबीर शेख यांनी आंदोलनकर्त्या नगरसेकांना प्रश्न उपस्थित केलाय की महानगर पालिकेत सत्ता तुमची असतांना तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ का यावी? ये पब्लिक है ये सब जानती है। असं म्हणत आंदोलनकर्त्या नगरसेवकांची बोलती बंद केली.


धुळे महानगर पालिकेच्या क्षेत्रातील काही स्मशानभूमींची दुरावस्था झालीय. स्मशानभूमीत मान खाली घालतो ती श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाही तर स्वतःचीच लाज वाटते म्हणून मान खाली घालावी लागतेय, असं गंभीर वक्तव्य नगरसेवक शीतल नवले यांनी यावेळी केलं. मनपा प्रशासनावर केलेले आरोप चुकीचे सिद्ध झाल्यास महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावरच फाशी घेईल असा इशारा देखील नगरसेवक शीतल नवले यांनी मनपा प्रशासनाला दिलंय.


नगरसेवक शीतल नवले यांनी जरी प्रशासनावर आरोप केले असले तरी धुळे महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. असं असतांना सत्ताधारी भाजपचे प्रशासनावर अंकुश नाही काय? यासंदर्भात संबंधित नगरसेवकांनी नगर विकास विभाग, शासनाकडे तक्रार का केली नाही ? असे प्रश्न यावेळी महानगर पालिका क्षेत्रात चर्चेत होते .