On This Day In History : जगाच्या आणि भारताच्या इतिहासात आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे.1 एप्रिल हा दिवस जगभरात एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. तर भारतात याच दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयची स्थापना करण्यात आली. याच दिवशी अॅपल या कंपनीची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँक 1 एप्रिल 1935 रोजी स्थापन झाली आणि 1 जानेवारी 1949 रोजी तिचे राष्ट्रीयीकरण झाले. ही केंद्रीय बँकिंग प्रणाली आहे. त्याची नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे प्रादेशिक कार्यालये आहेत. 1 एप्रिल 1976 रोजी, स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझ्नियाक आणि रोनाल्ड वेन यांनी कॅलिफोर्नियामध्ये Apple Inc. ची स्थापना केली. 


देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 1 एप्रिल या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे, 


1582: फ्रान्समध्ये एप्रिल फूल हा दिवस साजरा करण्यास सुरुवात


आजचा दिवस हा एप्रिल फूल (April Fool's Day) म्हणून साजरा केला जातोय. आजच्या दिवशी एकमेकांना फसवण्यासाठी, फूल बनवण्यासाठी अनेक क्लुप्त्या शोधल्या जातात. या दिवसाची सुरुवात 1 एप्रिल 1582 रोजी करण्यात आली. फ्रान्समध्ये 1582 मध्ये पोप चार्ल्स यांनी जुन्या कॅलेंडरच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर सुरू केले. मात्र त्यानंतरही काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करत होते. त्यामुळे जुन्या कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणाऱ्यांना एप्रिल फूल म्हटले गेले. तेव्हापासून 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात आल्याचं सांगितलं जातं.


1793: जपानच्या ज्वालामुखी उद्रेकात 53 हजार लोकांचा जीव गेला


आजचा दिवस जपानच्या इतिहासातील काळा दिवस आहे. 1 एप्रिल 1793 रोजी जपानमध्ये अनसेन ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामध्ये सुमारे 53,000 लोक मरण पावले.


1869: आयकर लागू करण्यात आला


आज इतिहासात, 1 एप्रिल 1869 साली ब्रिटिशांनी भारतात सर्वप्रथम आयकर (Income Tax) लागू करण्यात आला. त्यानुसार 200 ते 500 रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांवर कराची तरतूद होती. 200 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांवर 2 टक्के आणि वार्षिक 500 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांवर 4 टक्के कर आकारण्याची तरतूद करण्यात आली होती. लष्कर, नौदल आणि पोलिस कर्मचाऱ्यांना आयकर कायद्यातून सूट देण्यात आली होती. मात्र त्यावेळी बहुतांश कर्मचारी हे इंग्रजी होते. 


1869: नवीन घटस्फोट कायदा अस्तित्वात


ब्रिटिशकालीन भारतात आजच्याच दिवशी, 1 एप्रिल 1869 रोजी नवीन घटस्फोट कायदा (Divorse Act) अस्तित्वात आला.


1878: कलकत्ता संग्रहालय त्याच्या सध्याच्या इमारतीत लोकांसाठी खुले करण्यात आले.


1882: पोस्टल बचत बँक प्रणालीचा परिचय.


1889: 'द हिंदू' हे दैनिक वृत्तपत्र म्हणून सुरू 


1 एप्रिल 1889 पासून 'द हिंदू' (The Hindu) हे दैनिक वृत्तपत्र म्हणून प्रकाशन सुरू झाले. द हिंदू चे मुख्यालय चेन्नई येथे आहे आणि 1878 मध्ये साप्ताहिक मासिक म्हणून प्रकाशन सुरू केले. हे भारतातील प्रमुख इंग्रजी दैनिकांपैकी एक आहे. 2014 च्या भारतीय वाचक सर्वेक्षणानुसार, द टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान टाईम्स नंतर द हिंदू हे भारतातील तिसरे सर्वाधिक वाचले जाणारे इंग्रजी वृत्तपत्र आहे. 


1930: शारदा कायदा लागू, लग्नासाठी मुलीचे वय 14 आणि मुलाचे वय 18 निश्चित


28 सप्टेंबर 1929 रोजी इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल ऑफ इंडियामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा, 1929 (Child Marriage Restraint Act, 1929 - Sharda Act) मंजूर करण्यात आला. त्यानुसार मुलींसाठी लग्नाचे वय 14 आणि मुलांसाठी 18 निश्चित करण्यात आले होते. या कायद्याचे प्रणेते हरविलास शारदा यांच्या नावाने तो 'शारदा कायदा' म्हणून ओळखला जातो. सहा महिन्यांनंतर 1 एप्रिल 1930 रोजी तो अंमलात आला आणि तो केवळ हिंदूंनाच नाही तर ब्रिटिश भारतातील सर्व लोकांना लागू झाला. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा तो परिणाम होता. ब्रिटीश अधिकार्‍यांचा तीव्र विरोध असूनही, हा कायदा ब्रिटीश भारतीय सरकारने संमत केला होता. 


1935: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना (RBI) 


देशाची केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (Reserve Bank of India) स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी स्थापना करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार त्याची स्थापना करण्यात आली. भारताचे अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बाबासाहेबांनी हिल्टन यंग कमिशनसमोर बँकेची कार्यपद्धती आणि त्याचा दृष्टीकोन ठेवला होता. हा आयोग 1926 मध्ये रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स या नावाने भारतात आला होता. हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनंतर ब्रिटीश विधानसभेने त्याला कायद्याचे स्वरूप दिले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 असे नाव दिले. सुरुवातीला आरबीआयचे मध्यवर्ती कार्यालय कोलकाता येथे होते. 1937 साली ते मुंबईत हलवण्यात आले. पूर्वी ही एक खाजगी बँक होती परंतु 1949 रोजी आरबीआयचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. 


1935: भारतीय पोस्टल ऑर्डर लाँच.


1937: माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा जन्म.


देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा जन्म 1 एप्रिल 1937 रोजी झाला. 


1956: कंपनी कायदा लागू


देशात 1 एप्रिल 1956 पासून कंपनी कायदा (The Companies Act 1956) लागू करण्यात आला. या कायद्यानुसार कंपन्या नोंदणीद्वारे तयार केल्या जाऊ शकतात आणि कंपन्या, त्यांचे संचालक आणि सचिव यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात. नंतरच्या काळात यामध्ये अनेक बदल करण्यात आले. 


1957: एक पैशाची दशांश नाणे म्हणून सुरुवात


1 एप्रिल रोजी दशांश नाण्यांची सुरुवात म्हणून एक पैसा सुरू करण्यात आला. या आधारे टपाल तिकिटांची विक्रीही सुरू झाली.


1962 : मेट्रिक वजन प्रणाली पूर्णपणे स्वीकारली गेली.


1973 : भारतातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची सुरुवात.


1976: दूरदर्शनसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आले, ज्याचे नाव दूरदर्शन होते.


1976: स्टीव्ह जॉब्सने आपल्या मित्रांसह अॅपल कंपनीची स्थापना केली.


1 एप्रिल 1976 रोजी, स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs), स्टीव्ह वोझ्नियाक (Steve Wozniak) आणि रोनाल्ड वेन (Ronald Wayne) यांनी कॅलिफोर्नियामध्ये Apple Inc. ची स्थापना केली. 


Apple Inc. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे ज्याचे मुख्यालय क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे आहे. कमाईच्या बाबतीत सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे. मार्च 2023 पर्यंत, Apple ही बाजार भांडवलानुसार जगातील सर्वात मोठी कंपनी आहे


1978: भारताच्या सहाव्या पंचवार्षिक योजनेचा शुभारंभ.


1979: इराण इस्लामिक प्रजासत्ताक बनले.


1992: आठव्या पंचवार्षिक योजनेचा शुभारंभ


2004: Google ने Gmail ची घोषणा केली


1 एप्रिल 2004 रोजी गुगलने Gmail लाँच केले. त्यामुळे संभाषणामध्ये अधिक सुलभता निर्माण झाली. 


2010: देशात 15 व्या जनगणनेचं काम सुरू


पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभासिंग पाटील यांच्या तपशिलांच्या रेकॉर्डिंगसह, देशात 15 व्या जनगणनेचे काम सुरू झाले.