Maharashtra Weather Update : गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे. या परतीच्या पावसाचा (Rains) सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेला कांदा, सोयाबीनसह वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाच्या धसक्याने रायगडमधील भातकापणी ठप्प पडली असून, पुण्यात भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या (Meteorological Department) वतीने वर्तवली आहे.
Weather Update: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कसे असेल राज्यातील हवामान?
मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह महाराष्ट्रात काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो असा इशारा IMD ने दिलाय .अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैऋत्येकडे सरकले. तर पुढील 24 तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. असे असले तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
Heavy Rain : पावसामुळे निफाडला द्राक्ष, कांदा, मका पिकांचे नुकसान
निफाड तालुक्यात गेली दोन दिवस रात्रभर सुरु राहिलेल्या बेमोसमी पावसाने द्राक्ष, कांदा, मका, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष पीक रोगांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच चिखल तुडवत फवारणीसाठी लगबग सुरु झाली आहे. निफाड तालुक्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात शनिवारी व रविवारी रात्रभर बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला आहे. द्राक्षमाल हा अवकाळीच्या तडाख्यात सापडला असून रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच फवारणी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. फवारणीसाठी ट्रॅक्टरला पाणी व चिखलाचा मोठा अडसर ठरत आहे. द्राक्षे फवारणीचा खर्च मोठा असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
आणखी वाचा