Maharashtra Weather Update: राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याचे पुढे आले आहे. उन्हाळ्याच्या हंगामाचा दुसऱ्याच महिन्यात उन्हाच्या तीव्र चटक्यांचा (Temperature) अनुभव नागरिकांना येत आहे. महिन्याच्या सुरुवातीला मुंबई परिसरासह कोकण विभागात उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या असून साऱ्यांना चांगलाच घाम फोडलाय.
आशातच गेल्या आठवडाभर सातत्याने वाढत गेलेल्या मुंबईच्या (Mumbai) तापमानात मंगळवारी (11 मार्च) अचानक वाढ झालीय. उपनगरांतील पारा 39 अंशापार गेल्याची नोंद करण्यात आली आहे. वाऱ्याच्य प्रतिचक्रीय स्थितीमुळे पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे सक्रिय असल्याने चढ्या तापमानाचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. परिणामी, आज (12 मार्च) बुधवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला नसला तरी उष्ण व दमट वातावरण राहील, अशी शक्यता आहे.
मुंबईत उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता
मुंबईतील सांताक्रुज हवामान केंद्रावर 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कुलाब्यात देखील 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान काल नोंदविण्यात आलंय. पुण्यात तपमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवर गेलाय. तर रत्नागिरीत देखील 39.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून आज मुंबईत उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता आहे. परिणामी, संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रादेशिक हवामान विभाग(IMD) आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा भडका उडाला असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसतेय. येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यात उष्माघाताची लाट येण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यंदा उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला (39.5 अंश) जिल्ह्यात नोंदवल्या गेलंय. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) आज 12, आणि 13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा(IMD Forecast) दिला आहे. 12 आणि 13 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिट व्हेवचा इशारा हवामान विभागाने दिलाय.
उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठीचे उपाय
• तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
• हलके, सौम्य व फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
• प्रवासात पाणी सोबत ठेवा.
• मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, कारण त्याद्वारे शरीराचे निर्जलीकरण होते.
• उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
• तुम्ही बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या.
• तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
• पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
• तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
• ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा 'हायड्रेट' करण्यास मदत होते.
• जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
• तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
• पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.
हे ही वाचा