ठाणे : भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) मंदिर उभारले गेले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा 17 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या निमित्ताने 14 ते 17 मार्च या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्यासह विविध मंत्री, आमदार, खासदार तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
14 मार्च रोजी सकाळी विधीपूजा, गोप्रवेश आणि सामूहिक हरिपाठ होणार आहे. सायंकाळी "शक्तीभक्ती शिवसंध्या" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 मार्च रोजी धर्मध्वज पूजन, मंदिर द्वार प्रवेश, होम हवन, महिलांसाठी हळदीकुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी अभिनेत्री रुचिता लोढक यांचा विशेष कार्यक्रम आणि "मी वाहिनी होते" या कार्यक्रमाचे सादरीकरण (लेखन व अभिवाचन - अँड. आनंद देशमुख, अवधूत गांधी) होणार आहे. 16 मार्च रोजी "शिवकालीन ललकार" या भव्य ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठ्यांच्या इतिहासावर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम या दिवशी सादर केला जाणार आहे. 17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण विधी, क्षेत्रपाल पूजन आणि होम हवन पूर्णाहुती यांसह विविध धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
हे मंदिर केवळ एक दर्शनस्थळ नसून शक्तिपीठ म्हणून उभारले गेले आहे. येथे गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुविधा तसेच शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. मंदिराची रचना गड किल्ल्याप्रमाणे करण्यात आली असून दीड एकर जागेत तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात अखंड कृष्णशिला (काळ्या पाषाणातील) 6 फूट उंचीची सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. ही मूर्ती मैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. तसेच, मंदिराच्या तटबंदीच्या खालील 36 चबुतऱ्यांवर छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले असून, त्यांची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची एकूण उंची 56 फूट असून, मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची 42 फूट आहे. त्यामुळे या मंदिराला गडदुर्गाच्या धर्तीवर भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाला शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची जपणूक करणाऱ्या प्रत्येकाने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.