बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीनं घेतली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे तर भाजपकडून किसन कथोरे हे उमेदवार आहेत. काल बहुमत पास झाल्यानंतर आजच्या अध्यक्ष निवडीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज घेण्याची वेळ आज सकाळी 10 वाजेपर्यंत आहे. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास निवडणूक होणार नाही. पण जर निवडणूक झाली तर ती खुल्या पद्धतीने व्हावी, यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे.
असा आहे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम :
* विधानसभा अध्यक्षांची निवड 1 डिसेंबरला सकाळी 11 वाजता
* विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत
* नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत
* नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 1 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत
विरोधी पक्षनेत्याच्या घोषणेबाबत संभ्रम
विरोधी पक्षनेत्याची घोषणा आज होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. कारण, विधानसभेतील आजच्या कामकाचं स्वरुप पाहिल्यास अध्यक्षांनी तालिका नामनिर्देशित करणे, त्यानंतर अध्यक्षांची निवडणूक आणि राज्यपालांचं अभिभाषण असा क्रम देण्यात आलाय. त्यात विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत घोषणेचा उल्लेख नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याची घोषणा आज होणार की नाही, हा प्रश्न कायम आहे.
महाविकास आघाडी बहुमत चाचणीत पास
दरम्यान, काल उद्धव ठाकरे सरकारनं बहुमत चाचणी 169 विरुद्ध शून्य अशा फरकानं सिद्ध केलं. विश्वासदर्शक ठरावापूर्वी भाजप आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी मनसेचा 1, एमआयएमचे 2 आणि माकपचा एक सदस्य तटस्थ राहिले. भाजपनं मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या शपथविधी आणि अधिवेशनही बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. मात्र, हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचा आक्षेप फेटाळून लावला. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.