हे होत असताना राज्यपालांनी दिल्लीत राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. अजित पवारांना सोबत घेऊन केलेल्या भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी होणार आहे. 24 तासाच्या आत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे बाजू मांडणार आहेत. तर राज्य सरकारच्या वतीनं अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल हे बाजू मांडणार आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. सुप्रीम कोर्टातल्या महत्वाच्या घडामोडी आधी दोघांची भेट महत्वाची ठरणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
कोणालाही कल्पना नसताना काल सकाळी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे गुपचूप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतरही राज्यातील सत्तासंघर्षाचा ड्रामा संपलेला नाही. कारण भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
राज्यपालांनी घेतलेला सरकार स्थापनेचा निर्णय हा बेकायदेशीर आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांनी मांडली आहे. तसेच विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावं, असेही या पक्षांचे म्हणणे आहे. तिन्ही पक्षांनी याचिकेद्वारे मागणी केली आहे की, उद्याच विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात यावे. त्यानंतर बहुमताची जी प्रक्रिया यावेळी पार पडेल, त्याचे चित्रीकरण केले जावे, जेणेकरण कोर्टासमोर सर्व पुरावे उपलब्ध होतील.
आपापल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवलं
फोडाफोडीच्या भीतीनं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपापल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवलं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईतल्या रेनेसान्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. काल वाय बी चव्हाण सेंटरमधली बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना बसमधून रेनेसान्स हॉटेलमध्ये नेण्यात आलं. या आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यावर देण्यात आली आहे. शिवसेना आमदारांचा हॉटेल ललितमधला मुक्कामही वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आमदारही मुंबईबाहेर जाणार नाहीत. त्यांनाही अंधेरीच्या जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याच्या शक्यतेनं काँग्रेस आमदारांना मुंबईतच ठेवलं गेलंय.