कोलकाता : ऐतिहासिक डे नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच टीम इंडिया विजया उंबरठ्यावर पोहोचली आहे. पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशची दुसऱ्या डावातही दाणादाण उडवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशची सहा बाद 152 अशी अवस्था झाली होती. भारताकडून ईशांत शर्माने दुसऱ्या डावातही चार फलंदाजांना माघारी धाडले. तर उमेश यादवनं दोन बळी मिळवले. बांगलादेशचा मुशफिकुर रहीम एकाकी झुंज देत नाबाद 59 धावांवर खेळत आहे. दरम्यान बांगलादेशचा संघ अजूनही 89 धावांनी मागे आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, कालच्या 3 बाद 174 धावांवरुन पुढे खेळताना टीम इंडियाने आपला पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 241 धावांची भक्कम आघाडी मिळाली. कर्णधार विराट कोहलीचे शतक हे भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरले. विराटने जबाबदारीने खेळ करत 136 धावांची खेळी उभारली. त्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह चौथ्या विकेटसह 99 धावांची भागीदारी रचली. रहाणेने 51 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून अल अमीन आणि इबादत हुसेनने प्रत्येकी तीन तर अबू झायेदने दोन विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं ऐतिहासिक कोलकाता कसोटीत खणखणीत शतक झळकावलं. डे-नाईट कसोटीत भारताकडून पहिलं शतक झळकावण्याचा मान विराटनं मिळवला. तायजुल इस्लामच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत 159 चेंडूत विराटनं शतकाला गवसणी घातली. त्याच्या या शतकी खेळीत 12 चौकारांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 27 शतकं झळकावण्याच्या सचिनच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. 141 डावांत विराटने आपलं 27 वं शतक झळकावलं आहे.

विराट रिकी पॉन्टिंगच्या विक्रमापासून केवळ एक शतक दूर
विराट कोहलीच्या कसोटी कारकीर्दीतलं हे आजवरचं 27वं कसोटी शतक ठरलं. तर त्याची आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या 70 वर जाऊन पोहोचली आहे. वन डे क्रिकेटमध्ये विराटच्या नावे 43 शतकांची नोंद आहे. सर्वाधिक कसोटी शतकांच्या यादीत विराटनं दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅलन बॉर्डर यांच्या शतकांशी बरोबरी साधली आहे. त्या दोघांनीही कसोटीत प्रत्येकी 27 शतकं ठोकली आहे. आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीतही विराट आता रिकी पॉन्टिंगच्या विक्रमापासून केवळ एक शतक दूर आहे. विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतलं हे 70वं कसोटी शतक ठरलं. सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 100 शतकांसह पहिल्या, तर पॉन्टिंग ७१ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.