Bjp Disputes: भाजपात पक्षांर्तगत अनेक वाद असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari)  विरुद्ध देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) असा वाद असल्याचा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरात पाण्याच्या मुद्यावरून काढण्यात येणाऱ्या मोर्च्याला लावण्यात आलेल्या बॅनरवर नितीन गडकरी यांचा फोटो नसल्याने यावर प्रतिक्रिया देताना खैरेंनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. 


यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, भाजप पक्षात अंतर्गत खूप काही भांडणं आहेत. नितीन गडकरी विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा वाद आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्षात विदर्भात सुद्धा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या वादाशी आम्हाला काही देणंघेणं नाही असं खैरे म्हणाले. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये भाजपकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर गडकरी यांचे फोटो नसल्याने चर्चा होत असतानाच खैरे यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे खैरेंच्या विधानामुळे पुन्हा एकदा भाजपमधील पक्षांतर्गत वादाची चर्चा समोर अली आहे. त्यामुळे खैरेंच्या आरोपाला भाजपकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


शिवसेनेला श्रेय मिळू नयेत म्हणून भाजपचं नाटक... 


औरंगाबादमध्ये भाजपकडून काढण्यात येत असलेल्या 'जल आक्रोश मोर्च्या'वर बोलताना खैरे म्हणाले की, मी आणलेली समांतर जल योजना काँग्रेसच्या काळात आणली होती. यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) यांनी बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे या योजेनच श्रेय शिवसेनेला मिळेल,उद्धव ठाकरेंना मिळेल असे भाजपला वाटत असून त्यामुळेच हे सर्व नाटकं सुरु असल्याचं खैरे म्हणाले. तर मी आणलेल्या योजनेचं कौतुक झाले होते. लोकसभेत त्यावेळच्या मंत्र्यांनी सुद्धा खूप चांगली योजना असल्याचं म्हटलं होते. पण भाजपने होऊ दिले नसल्याने आज औरंगाबादकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सुद्धा भाजपकडून करण्यात आला आहे.