Aurangabad Politics: आगामी काळात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेच्या गटात अनेक नावांची चर्चा होत आहे. यात शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे याचे पडसाद औरंगाबादमधील शिवसेनेच्या स्थानिक गटात उमटताना पाहायला मिळत आहे. जर खैरे याना राज्यसभेत संधी मिळाली तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा दानवे गटात पाहायला मिळत आहे.


औरंगाबादमधील शिवसेनेचा राजकीय आढावा घेतला तर खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील पक्षांर्तगत वाद काही नवीन नाही. ह्या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तर बऱ्याचवेळा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा एकमेकांना चिमटे काढण्याची संधी दोन्ही नेते सोडत नाही. त्यात गेल्यावेळी खैरेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. तर आगामी लोकसभा निवडणुकीत दानवे सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर खैरे यांना राज्यसभेवर संधी मिळाली तर शिवसेनेकडे दानवेंशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यांचा लोकसभेच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होणार आहे. 


सहाव्या जागेसाठी चुरस...... 


राज्यसभेच्या सहा जागेसाठी भाजपकडून 2 तर शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी एक जागेवर निवडून येऊ शकतात. त्यामुळे उरलेल्या एक म्हणजेच सहाव्या जागेवर आपल्याला संधी द्यावी अशी विंनती संभाजीराजे यांनी सर्वच पक्षाकडे केली आहे. तर त्यांच्या याच विंनतीनंतर राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा सुद्धा जाहीर केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेनं सहावी जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. 


संभाजीराजेंना शिवसेनेची ऑफर..... 


राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून करण्यात अली आहे. त्यामुळे सहावी जागा लढवण्यासाठी रिंगणात असलेल्या संभाजीराजे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातच नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात भेट झाले आहे.त्यामुळे संभाजीराजे यांच्याबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असून, त्यांनंतरच सहाव्या जागेबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.