चिपळूण (रत्नागिरी) : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि त्यांचे निकालही लागले. त्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडतही झाले. काही गावांमध्ये पती-पत्नी सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले. तर काही गावात तरुण-तरुणींच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यामधल्या ओवळी गावात 70 वर्षांच्या आजीबाई सरपंच बनल्या आहेत. आदिवासी कातकरी समाजामधील 70 वर्षांच्या आजीबाई आता पुढील पाच वर्षे ओवळी गावाचा कार्यभार पाहणार आहेत.


ओवळी गावातील आदिवासी कातकरी वस्तीत जवळपास 30 ते 35 घरं आहेत. या वस्तीमधल्या 70 वर्षांच्या शेवंती पवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. या आजीबाई संसाराचा गाडा हाकता हाकता आता गावागाडाही हाकणार आहेत. गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांच्या खांद्यावर गावाची जबाबदारी सोपवली आहे. गावकऱ्यांच्या विश्वासाला मान देत आजीबाईंनी ओवळी गावाच्या विकासकामाजी जबाबदारी स्वीकारली आहे.



केवळ चिपळूण तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्हात आदिवासी कातकरी समाजातील आमची आजीबाई सरपंच झाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया वस्तीमधील गावकऱ्यांनी दिली आहे.



या आजी आपल्या घरात चुलीवरचा स्वयंपाक आटोपून घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीकडे चालत जातात आणि चालत येतात. 70 वर्षांचा अनुभव उराशी बाळगून गावतील पाणी, रस्ते आणि विविध समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडवण्याचा ध्यास त्यांच्यासमोर आहे. शिवाय गावातील शाळेबाबतचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा गावकरी करत आहेत.


या आजीबाईनी पुढील पाच वर्षांत गावचा कायापालट केला तर इतिहासच घडेल. खरंतर आदिवासी कातकरी समाज अजूनही मागेच आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 70 वर्षांच्या आजी सरपंच बनल्याने ओवळी गावात इतिहास रचला आहे.