लंडन: दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठ्या व्यासपीठावर मोक्याच्या क्षणी कोलमडून का पडतो, या प्रश्नाचं उत्तर कर्णधार एबी डिव्हिलियर्सकडे या क्षणी तरी नाही. पण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून खेळत राहण्याचा आणि 2019 सालच्या विश्वचषकावर दक्षिण आफ्रिकेचं नाव कोरण्याचा त्याचा इरादा पक्का आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या अस्तित्त्वाच्या लढाईत दक्षिण आफ्रिकेला भारताकडून आठ विकेट्सनी का पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर तुला अजूनही कर्णधारपदी का राहायचंय असा प्रश्न एका दक्षिण आफ्रिकी पत्रकारानंच डिव्हिलियर्सला विचारला.
त्यावर त्याचं उत्तर होतं, "कारण मी चांगला कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेला पुढे घेऊन जाण्याची माझ्यात क्षमता आहे. मी या संघाला विश्वचषक जिंकून देऊ शकतो, हा माझा विश्वास आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतही मला तोच विश्वास होता. आणि त्यातल्या पराभवानंतरही माझा स्वत:वरचा विश्वास ढळलेला नाही".
एबी डिव्हिलियर्सचं हे उत्तर त्याचा आत्मविश्वास दाखवून देणारं आहेच, पण दक्षिण आफ्रिकेला 2019 सालचा विश्वचषक जिंकून देण्याचं स्वप्न तो किती तीव्रतेनं बघतो आहे हेही दाखवून देणारं आहे.