खडसे म्हणाले की, महाविकासआघाडीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाले असतील असं वाटत नाही. ज्या पद्धतीने अजित पवार त्यांच्यातून वेगळे झाले. एकमेकांवर विश्वास नव्हता म्हणून अजित पवारांनी वेगळे पाऊल उचलले. महाविकासआघाडीत नेते मनापासून एकत्र नव्हते. ते तत्वाने एकत्र नव्हते, शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिलेलं दिसतंय, असंही खडसे म्हणाले. ते म्हणाले की, आम्हाला सत्ता हवीय आणि भाजप नको असे म्हणत होणारी ही आघाडी फारशी टिकलीही नसती. यामध्ये शिवसेनेची सर्वात मोठी गोची झाली आहे. सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे, असेही खडसे म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते काहीही करून राज्याला स्थिर सरकार देतील असा विश्वास होता, असे खडसे म्हणाले. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तर भाजपला संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे की, अजित पवारांसोबत आमदारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
राज्यात एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार असं वाटत असतानातच, भाजपने राजकारणात मोठा भूकंप घडवला. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा मांडण्यास तयार झाली. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत सहमती देखील झाली. परंतु आज सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला.