लातूर : मानवी वस्तीत वन्य (Forest) प्राण्याचा वावर ही बाब चिंताजनक बनली असून गेल्या काही दिवसांत बिबट्या हल्ल्यात दोघांचा जीव गेल्याची घटनादेखील समोर आली आहे. त्यामुळे, वन विभागाकडून योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांना मोकळा श्वास देण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यातच, लातूर (Latur) जिल्ह्यात देवणी शहरातील पंचायत समिती परिसरात आज दुपारी सुमारास तीन वाजताच्या सुमारास एका पिसाळलेल्या लांडग्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. या लांडग्याच्या हल्ल्यात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून, यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे.
पंचायत समिती आवारात एका पिसाळेला लांडगा अचानक आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यातच, या हल्ल्याने येथील नागरिकांवर झडप घातल्याने सगळंच घाबरले. लांडग्याने 5 ते 6 जणांवर वेगाने हल्ला चढवला, हल्ला एवढा वेगवान होता की, तो लांडगा होता की चित्ता, हे कोणालाच समजू शकले नाही. क्षणात हल्ला करून तो प्राणी नजरेआड झाला. त्यामुळे, परिसरात भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये इनाया इस्माईल मल्लेवाले (वय ३), फयजान फिरोज येरोळे (वय ९), युनूस सरदार मिर्झा (वय ५५), चन्नय्या अप्पा भद्रशेट्टे (वय ५५) आणि गोविंदा माणिकराव मेहत्रे (वय ३८) यांचा समावेश आहे. यापैकी युनूस मिर्झा आणि चन्नय्या भद्रशेट्टे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उदगीरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, हल्ला करणारा हा प्राणी लांडगाच होता असे तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. दरम्यान, जखमीपैकी काहींना डोळ्याजवळही गंभीर दुखापत झाली आहे.
तालुक्यातील वन विभाग निष्क्रीय
दरम्यान, घटनेची माहिती देण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित वनअधिकाऱ्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ येत असल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, तालुक्याच्या ठिकाणी वनअधिकाऱ्यांचे कार्यालयच नसणे ही देवणी तालुक्याची शोकांतिका असल्याचे नागरिक सांगतात. अशा घटना घडत असताना अधिकारी मुख्यालयाबाहेर राहणे गंभीर बाब असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी परिसरात सावधानता बाळगावी आणि वनविभागाने तातडीने पथक पाठवून या हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना