Latur NEET Exam Paper Leak Case: लातूर : नीट परीक्षा (NEET Paper Leak Case) मार्कवाढ प्रकरणात लातूर (Latur) जिल्ह्यातील कातपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या (Zilla Parishad School) मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा मलीन केल्याचं निलंबन आदेशात म्हटलं आहे. 


नीट (NEET Exams) पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण याचं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केलं आहे. जलीलखाँ पठाण हा लातूर जिल्ह्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होता. जलीलखाँ पठाण आणि संजय जाधव हे दोघं लातुरातून नटी पेपरफुटीचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, जलीलखाँ पठाण विरोधात नांदेड एटीएसच्या पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही केली आहे. 


निलंबन आदेशात काय म्हटलंय? 


आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. त्यांची जबाबदारी शैक्षणिक कामकाज असताना त्यांची सेवेविषयी बेपर्वाई आणि अनास्था दिसून आली आहे, असं जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  निलंबन आदेशात म्हटलं आहे. 


लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव आणि कातपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक जलीलखाँ उमरखान पठाण हे दोघेजण पैसे घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती नांदेड एटीएसला मिळाली. त्यानंतर एटीएस पथक शनिवारी लातूरमध्ये दाखल झालं आणि संबंधित दोघांची पडताळणी आणि चौकशी केली. त्यांच्यासह इतरांवर रविवारी रात्री उशिरानं गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दोघांनाही अटक करण्यात आली. 


लातूर पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी नेमके कोण? 


लातूरमध्ये उघडकीस आलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात (NEET Exam Paper Leak Case) आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जलीलखाँ पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरन्ना कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे.