लातूर : देशात गेल्या काही महिन्यांपासून परिक्षांमधील होणाऱ्या घोळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. एकीकडे तलाठी आणि नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना समोर आल्यानंतर आता युजीसी नेट आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीच्या नीट परीक्षांचेही पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. देशभरात गदारोळ माजवणाऱ्या याच नीट (NEET) पेपरफुटीचं लातूर कनेक्शन (Latur News) आता थेट सोलापूर जिल्ह्यातील माढ्यापर्यंत (Madha) पोहोचलं आहे. याप्रकरणी दोन शिक्षकांना दहशतवाद‌विरोधी पथकाच्या पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आली आहे. त्यापैकी, अटक केलेल्या संजय जाधव यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने (Court) संजय जाधवला 6 दिवसांसाठी पोलिसांच्या कोठडीत पाठवलं आहे. 


वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' प्रकरणात आरोपी संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता. जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे. याप्रकरणी आरोपी संजय जाधव यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत आरोपी संजय जाधव हा दिल्ली आणि लातूरमधील दुवा होता. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात 4 लोकांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील जलील खान पठाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. यातील फरारी संजय जाधव यास काल अटक करण्यात आली. संजयला आज लातूर येथील न्यायालयात हजर आले असता त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


कोर्टात कसा झाला युक्तिवाद


नीट पेपर फुटीप्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे यांनी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. संजय जाधव हा लातूर येथील जलीलखा पठाण आणि धाराशिव येथील ईरणा कोणगलवार यांच्या संपर्कात होता. त्यांच्याकडून तो पैसे घेऊन पुढे गंगाधर यास पाठवत असे. याप्रकरणात गंगाधर आणि ईरणा कोणगलवार यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे, या कामासाठी संजय जाधव यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र, आरोपी संजय जाधव यांचे वकील यांनी युक्तिवाद करत बाजू मांडली. नांदेड एटीएसने यापूर्वीच आरोपींना ताब्यात घेतलं होतं, त्यांची चौकशी झाली होती. त्यामुळे इतक्या दिवसांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली होती. दरम्यान, पोलीस आणि दोन्ही बाजुच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने संजय जाधव यांस 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.


नीट (NEET) प्रकरणातील आरोपी शिक्षकानं पोलिसांच्या चौकशीनंतर पोबारा केला होता. आता अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या संजय जाधवबाबत शिक्षण विभागात अधिकृतरीत्या कोणताही अहवाल पोलिसांकडून देण्यात आलेला नाही. 


पैसे घेऊन चालवायचे रॅकेट


लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव आणि त्याचा मित्र उपशिक्षक जलीलखा उमरखान पठाण हे दोघेजण पैसे घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती एटीएस पथकाला समजल्यानंतर शनिवारी ते लातूरमध्ये दाखल झाले आणि संबंधित दोघांची पडताळणी आणि चौकशी केली आणि त्यांच्यासह इतरांवर रविवारी रात्री उशिरानं गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दोघांनाही अटक करण्यात आली. 


संजय जाधव माढ्यातील प्राथमिक शाळेत उपशिक्षक


संशयित आरोपी उपशिक्षक संजय जाधव 26 जून 2023 पासून माढा तालुक्यातील टाकळी प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याअगोदर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली देऊळ जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून 10 सप्टेंबर 2003 रोजी शाळेत हजर होऊन नियुक्त झाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सावंतवाडी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मडुरे नंबर 3 शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होता आणि तेथून तो 2 मे 2023 रोजी कार्यमुक्त होऊन टाकळी येथे रुजू झाला होता. तो आजपर्यंत येथीलच शाळेवर कार्यरत आहे.