रेणापूर, लातूर: मागील 33 महिन्यांपासून थकलेला पगार मिळावा यासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. थकीत पगारासाठी कर्मचाऱ्यांनी अंगावर पेट्रोल, डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारखान्याच्या 24 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मार्गदर्शनात हा साखर कारखाना सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा विभागातील आणि इलेक्ट्रीशियन वायरमन यांचा 33 महिन्यांपासून पगार थकीत आहे. याबाबत कारखाना प्रशासनाला वेळोवेळी कळवून ही पगार मिळू शकला नाही. थकीत पगार मिळावा आणि भविष्य निर्वाह निधी जमा व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू होता. पगार आणि ईपीएफ जमा व्हावा अन्यथा कारखान्याच्या गेट समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदारांसह कारखाना प्रशासनास 21 दिवसांपूर्वी एका निवेदना द्वारे दिला होता.
थकीत वेतनासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतरही कारखाना प्रशासनाने किंवा साखर संघाकडून कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. आत्मदहन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी आधीच दिला होता. त्यामुळे घटनास्थळी पोलीस हजर होते. त्यांनी या कर्मचाऱ्यांना आत्मदहन करण्यापासून रोखले. यावेळी रेणापूर पोलिसांनी 24 अंदोलक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वतःचा रोष व्यक्त केला आहे. या कारखानाच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालक प्रजा गोपीनाथराव मुंडे आहेत. तर मार्गदर्शक पंकजा मुंडे आहेत.
वैद्यनाथ साखर कारखाना पुन्हा सुरु करणारच, पंकजा मुंडे समर्थकांनी जमवले 5 कोटी
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईनंतर 19 कोटींची थकबाकी प्रकरणी लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर, आपण आर्थिक अडचणीत सापडल्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, असे असतांना आता पंकजा मुंडे यांच्या मदतीला मुंडे समर्थक धावून आले आहेत. पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि उसतोड कामगारांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी लोकवर्गणी जमा केली. मात्र, पंकजा मुंडे यांनी ही लोक वर्गणी न स्वीकारत लोकांच्या पाठिंब्यावर कारखाना पुन्हा सुरू करू असे म्हटले. होते.