लातूर : देवेंद्र फडणवीस हे निवडूनच येणार नाहीत, त्यांच्या पक्षाचे आमदारही निवडून येणार नाहीत मग ते मुख्यमंत्री कसे होतील हा प्रश्न आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. अमित शाहांनी त्यांच्या भाषणात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील असे संकेत दिले आहेत. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. लातूरच्या निलंगा येथे काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली.
पतप्रधानांनी फूट पाडू नये
नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात 'एक है, तो सेफ है' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, प्रधानमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने असं स्टेटमेंट करणं हा लोकशाहीला एक प्रकारचा कलंक आहे. नरेंद्र मोदी म्हणून ते हे विधान करू शकतात. मात्र देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने देशातील लोकांमध्ये विभाजन करण्याची मानसिकता निर्माण केलेली आहे. देश विभागला गेलेला आहे. नरेंद्र देश हे सांभाळू शकत नाहीत, हे घाबरून गेले आहेत असं त्यांच्या विधानावरून दिसत आहे.
छगन भुजबळ खरेच बोलले
आपण ओबीसी असल्यानेच आपल्या मागे ईडी लावली आणि तुरुंगात टाकल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, देशामध्ये हिटलरशाही आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी खरं सांगितलं हे त्यांच्याच आघाडीतले लोक म्हणत असतील. ज्या नवाब मलिक यांना दाऊदचा सोबती म्हणून जेलमध्ये टाकलं, तेच आज महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता महाराष्ट्राला दिसत आहे.
बदलापूरच्या शाळेत ब्ल्यू फिल्म बनवल्या जायच्या
बदलापूरच्या शाळेत ब्ल्यू फिल्म बनवल्या जायच्या असा आरोप नाना पटोले यांनी केला. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकरांचा हवाला देऊन पटोलेंनी हा आरोप केला. बदलापूरच्या शाळेत अवयवांची विक्रीही व्हायची. पण ही शाळा संघाशी संबंधित आहे म्हणून त्यावर कोणतीही कारवाई नाही असंही नाना पटोले म्हणाले. केतन तिरोडकरांनी हे प्रकरण हायकोर्टात नेल्याचा पटोलेंनी दावा केला. नांदेड जिल्ह्यातल्या वाजेगावच्या जाहीर सभेत नाना पटोलेंनी हा आरोप केला.
ही बातमी वाचा: