लातूर : महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षण आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे स्वागत स्वीकारण्यासाठी थांबले असता तिथं दाखल झालेल्या मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी दिलेलं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आणि त्यानंतर ते नांदेडकडे रवाना झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परळीतील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनसाठी आले होते. तिथं नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यांना पुढील दौऱ्यासाठी रवाना व्हायचं होतं. लातूरमधील विमानतळावरुन रात्रीचं उड्डाण होत नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते मार्गे नांदेडला निघाले होते. यावेळी अहमदपूर येथे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील घटना
अहमदपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आला असता मराठा अंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या आहेत.आरक्षण आमच्या हक्कचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देखील देण्यात आले. मुख्यमंत्री स्वागत स्वीकारण्यासाठी थांबलेले असताना तिथं मराठा आरक्षण आंदोलकांनी दाखल होत घोषणाबाजी सुरु केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाडीतून बाहेर येत आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आहे.
मुख्यमंत्री परळी येथील कार्यक्रम आटोपून अहमदपूर मार्गे नांदेड कडे निघाले होते.यावेळी अहमदपूर येथे आंदोलकांनी अचानक समोर येत घोषणाबाजी केली.
दरम्यान, आज मराठा आरक्षण आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केल्याची घटना घडली. तर, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरु असताना मराठा आरक्षण आंदोलक दाखल झाले होते. या आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. आज मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीसमोर घोषणा केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केलं, त्यानंतर मुख्यमंत्री नांदेडकडे रवाना झाले.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :