लातूर (उदगीर) : मतदाराला गृहीत धरणारे लोकप्रतिनिधी विचारांशी एकनिष्ठ का राहत नसतील? लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असे का वागतात? असा सवाल करत लातूरचे माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यावर थेट टीका केली आहे. लोकशाहीत लोकांशी इमान राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, लोकांशी इमान न राखणाऱ्या राजकारण्यांचे करायचे काय? याची चर्चा करण्याची वेळ आली आहे, असेही अमित देशमुख म्हणाले. उदगीर येथे झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 


आज उदगीर येथे झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काकाच्या नेतृत्वात दोघेही आमदार पुतणे इलेक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून आलं. माजी मंत्री  दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाख़ाली जिल्ह्यात महायुतीच्या विरोधात फळी तयार करण्याचे काम सुरू केलं असून देशमुख बंधूंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश दिला आहे. 


लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारा देशमुख परिवार आता जिल्ह्याभरात ऍक्टिव्ह मोडमध्ये आला आहे. याची सुरुवात आज उदगीरात पहावयास मिळाली आहे. उदगीरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संजय बनसोडे हे अजित पवार यांच्या साथीने महायुतीत सामील झाले, कॅबिनेट मंत्री झाले.  याचे शल्य राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सलत आहे अशी चर्चा आहे. नेमके हेच शल्य कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यानाही बोचत असल्याचे आज दिसून आले आणि तेच आजच्या उदगीरच्या कार्यक्रमात दिसून आले.


आज उदगीर येथे उदगीर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजनेची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी लातूरहून बोलावण्यात आलेले देशमुख परिवारातील तिन्ही नेते हजर होते. त्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूरचे आमदार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे व्यासपीठावर हजर होते. या सर्व नेत्यांच्या भाषणाचा रोख हा पक्षनिष्ठा आणि विचारसरणी यावर होता. अनेक सूचक वक्तव्य करत येत्या काळात उदगीर येथे सत्ताबदल झालाच पाहिजे, हा संदेश कका-पुतणे देशमुखांनी दिला. 


'अलीकडे राज्यात जे चालले आहे त्यात विचारांशी एकनिष्ठता दिसत नाही. राज्यात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. या उलथापालथी का झाल्या? कोणामुळे झाल्या? याचे उत्तर देता येणार नाही. आम्ही निवडून येतो आणि आम्ही तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करतो त्याच क्षणाला आमच्या डोक्यात असे विचार येतात. त्या विचाराला आम्ही कधी सोडचिट्ठी देतो हे आम्हालाही लक्षात येत नाहीत. उदगीरवरून मुंबईला जाताना एका पक्षाचा झेंडा आणि मुंबईवरून उदगीरला येताना दुसऱ्या विचाराचा झेंडा. असे का करतात माणसे हे लक्षात येत नाही' अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी संजय बनसोडे यांच्यावर केली.


'लोकशाहीत लोकांशी इमान राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यआहे. लोकांशी इमान न राखणाऱ्या राजकारण्यांचे करायचे काय याची चर्चा करण्याची वेळ आली आहे. आमच्याबाबतही इकडून तिकडे जाण्याच्या चर्चा सतत सुरु असतात. मात्र आम्ही विचाराशी फारकत घेणार नाही. चर्चा होत असतात. त्या होत राहतात. त्याकडे फारसे लक्ष देऊ नये. आम्ही विलासराव देशमुख यांच्या विचारावर काँग्रेसच्या विचारावर वाटचाल करत राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


'उदगीर विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. माझा आणि धीरज देशमुखांचा हा मतदार संघ नाही. आम्ही येथे येणार नाहीत. मात्र येणाऱ्या काळात येथील जनतेने काय विचार स्वीकारायचं याची चर्चा झाली पाहिजे. 2024 साली महाविकास आघाडीचा विचार घेऊन त्यावर येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाणार आहात. येथे मी आपल्या समोर आलो आहे तो हात जोडून  विनंती करण्यासाठीच की, महाविकास आघाडीचा विचार बळकट करु', अशी भावनिक साद आमदार अमित देशमुख यांनी उदगीरच्या कार्यकर्त्यांना घातली. 


शरद पवार यांच्या उपस्थिती संजय बनसोडे यांनी उदगीर येथे साहित्य संमेलन घेतले. निवडणुकीत पावसात शरद पवार प्रचाराला आले होते. आता हे त्यांना सोडून गेले आहेत. सैन्य निघून गेले. गनिमी कावा... मावळे...  महाराज .. मला वाटते सैन्य येथेच आहे.. सेनापती येथेच आहे... कोण निघून गेले आहे हे लोकांना माहीत आहे.. येत्या काळात बदल झालाच पाहिजे यावर अमित देशमुख यांनी जोर दिला.


'हिंदुत्वाचा विचार सांगत सत्ता मिळवता येते. मात्र सर्वसमावेशक विचारच देश चालवू शकतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सत्तेसाठी जे चालवले आहे ते योग्य नाही. त्यातून अनेक लोकप्रतिनिधी विचाराची फारकत घेत आहे. मात्र ग्रामीण भागातील मतदारास लगेच कळते की, धान्यातील मातरं बाजूला कसे काढायचे...?' अशी टीका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली. सूचक विधान करत उदगीरचे विद्यमान आमदार तथा मंत्री संजय बनसोडे यांना बाजूला असा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. 


आमचा विचार हा लोकांसाठी काम करण्याचा आहे, सहकार क्षेत्रासाठी असेल. लोकांच्या विकासासाठी सत्तेचा उपयोग केला पाहिजे. सत्ता येत असते जात असते. निवडणुका कधीही लागू शकतात. यावेळी आपण लक्षात ठेवावे की, जे लोकप्रतिनिधी स्वत:चा विचार करतात. आपल्या कुटुंबाचा विचार करतात.. त्यासाठी विचारही सोडतात. त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून द्यावी, अशी विनंती करत आमदार धीरज देशमुख यांनी संजय बनसोडे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. 


लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघापैकी चार मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात होते. मात्र राष्ट्रवादीचे उदगीरच्या आमदार संजय बनसोडे आणि अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटात गेले आहेत. जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सर्व सूत्रे ही नव्या राजकीय घड़ामोड़ीनंतर देशमुख  कुटुंबाच्या हातात आलेली आहेत. त्यामुळे काका आणि पुतण्यांनी उदगीर येथून निवडणुकीच्या मोडमध्ये असल्याचं दाखवून दिलं. यातून जिल्ह्यात देशमुख विरुद्ध इतर पक्ष अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.


ही बातमी वाचा: