Latur News Update : लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रूपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळे पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत.
लातूर जिल्ह्यात आज अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज ढगफुटी सारखा पाऊस पडला. कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा - अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर आहे.
औसा तालुक्यातील भेटा आणि अंदोरा येथे मुसळधार पाऊस झाला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सध्या वाहतूक बंद आहे. अनेक गावाचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत थांबवण्यात आले आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे पुलाची उंची वाढवण्याची मागणी करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
निलंगा तालुक्यातील वडगाव भागात आज ढगफुटी झाली. या गावाच्या शिवारातील प्रत्येक शेतात पाणीच पाणी झाले आहे. संपूर्ण शिवार पाण्याखाली गेले आहे. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील छोटे मोठे पूल पाण्या खाली गेले आहेत. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. शिवणी कोतल, शेडोळ, हाडगा याही भागात शेतांना जणू तलावाचे रुप आले आहे.
मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनची पीकं पिवळी पडली आहेत. त्यातच आज झालेल्या तुफान पावसामुळे. सर्व पिके वाहून गेली आहेत. शेतातील काळी माती वाहून गेल्याने खडके उघडी पडली आहेत. आता दुबार पेरणी तरी करायची कशी? असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या