Latur Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यातील हालसी या गावात जोरदार पाऊस झाला आहे. तर लातूर जिल्ह्याला लागूनच असलेल्या कर्नाटक राज्यातील तुगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. गावातील रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. तसेच शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे. तसेच या मुसळधार पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत.


पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान


तुगाव हे कर्नाटका राज्यातील गाव आहे. तर हालसी महाराष्ट्रातील गाव आहे. दोन्ही गावांच्यामधून मांजरा नदी वाहते. काल संध्याकाळी या भागात दीड तास पावसानं कहर केला. कर्नाटकातील तूगाव इथे कधी नव्हे असा पाऊस झाला.10 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कधीच शेत शिवारातील पाणी आले नव्हते. मात्र, या पावसामुळं शेत शिवारात पाणी साचलं आहे. तसेच गावातील प्रत्येक रस्त्याला ओढ्याचे स्वरुप आलं आहे. गावातील रस्त्यावरुन पाणी वाहत होते. गावातील प्रत्येक रस्ता हा नदीसारखा वाहत होता. यावरुन पावसाचा किती होता ते लक्षात येत आहे. या गावाच्या शिवारातील सोयाबीन पीक वाहून गेले आहे. दुबार पेरणीचीही शक्यता नाही. कारण पाण्याबरोबर माती देखील खरवडून गेली आहे. तुफान पाऊस चालू असताना वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता. तूगाव इथं ढगफुटी सारखा पाऊस पडला तर बाजूच्या महारष्ट्रातील हालसी इथे जोरदार पाऊस पडला आहे.




नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस


नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला आहे. नायगाव तालुक्यातील मांजरम, कोलंबी परिसरात आठवडा भराच्या विश्रांतीनंतर जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं परिसरात पाणीच-पाणी दिसून येत आहे. मांजरम परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. दरम्यान या पावसामुळं शेतात पाणीच पाणी झाले असून सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत.


राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच देशातील विविध भागात देखील दमदार पाऊस पडत असताना दिसत आहे. देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर या परिसारत पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: