Latur News : मराठवाड्यातील (Marathwada) महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी आंदोलनस्थळी भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांनी उपोषण मागे घेतले.

Continues below advertisement


गेल्या 40 वर्षांपासून महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये या समाजाला सहज प्रमाणपत्र मिळते. मात्र, मराठवाड्यात वेगळे निकष लावले जात असल्याने तिथे समाजाला अन्यायकारक स्थितीतून जावे लागत होते.


या पार्श्वभूमीवर समाजाने विविध आंदोलनांचा मार्ग स्वीकारला. अडीच वर्षांपासून चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. काही दिवसांपूर्वी निलंगा तालुक्यातील एका समाज बांधवाने या अन्यायाविरोधात आत्महत्या केल्याने समाजात तीव्र संताप उसळला. या पार्श्वभूमीवर चंद्रहास नलमले यांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते.


पालकमंत्र्यांची भेट आणि आश्वासन


उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपोषणस्थळी भेट देत समाजाच्या मागण्यांवर चर्चा केली. उर्वरित महाराष्ट्रात जे निकष आहेत तेच निकष मराठवाड्यात लागू केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन शिवेंद्रराजे भोसले यांनी उपोषणकर्त्यांना दिले. या आश्वासनानंतर मराठवाड्यातील महादेव कोळी समाजाचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह माजी मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे देखील उपस्थित होते.


महत्त्वाच्या मागण्या



  • मराठवाड्यातही महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणेच निकष लागू करावेत.

  • योग्य कागदपत्रे सादर केल्यास तात्काळ एसटी जात प्रमाणपत्र मिळावे.

  • प्रमाणपत्र वैधतेची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करावी.

  • आत्महत्या केलेल्या शिवाजी मेंळे यांच्या कुटुंबास भरघोस आर्थिक मदत व एका सदस्याला शासकीय नोकरीची हमी द्यावी.


आंदोलनास मिळाला मोठा पाठिंबा


चंद्रहास नलमले यांच्या आमरण उपोषणाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. भर पावसातही महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले आंदोलनात सहभागी झाली होती, ज्यातून समाजातील असंतोष स्पष्टपणे दिसून आला.



आणखी वाचा 


Laxman Hake on Manoj Jarange Patil : दिल्लीत काय खाऊ पेंड आहे का? देशाच्या लोकसंख्येत तुमची संख्या किती? मनोज जरांगेंच्या 'चलो दिल्ली'च्या नाऱ्यावर लक्ष्मण हाके संतापले