Latur Student Protested: लातूर संपूर्ण महाराष्ट्रात एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते. दहावी अकरावी बारावी अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच नेट आणि स्पर्धा परीक्षा त्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही खूप मोठी आहे. हे विद्यार्थी आज दुपारी अचानकपणे लातूर तहसील कार्यालय समोर एकत्र आले. कारण होते मेसचे वाढलेले दर. 


लातूर तहसील कार्यालय समोर विद्यार्थ्यांची गर्दी अतिशय उस्फूर्तपणे जमा झालेली होती. लातूर शहरातील तहसील कार्यालय समोर शहरातील मेस मालकाच्या असोसिशनच्या वतीने कोणतेही पूर्व सूचना न देता दर 400 रुपयांनी वाढवले. 1800 रुपये प्रति महिन्यावरून दर 2400 रुपये प्रति महिना करण्यात आला आहे. दोनच महिन्यापूर्वी सोळाशे रुपयेचा दर 1800 रुपये करण्यात आला होता. अवघ्या साठ दिवसांमध्ये पुन्हा चारशे रुपये वाढ करण्यात आली. तीन महिन्यात सहाशे रुपयांची दर वाढ विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आर्थिक अडचण निर्माण करणारी आहे. यामुळे नेट सेट आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत दाद मागायचं ठरवलं. याबाबत एक लेखी निवेदन घेऊन ते तहसीलदार यांना भेटायला निघाले होते. याची माहिती जेवायला आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना कळाली. काही क्षणातच 200 ते 300 पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी तहसील कार्यालयासमोर गर्दी करायला सुरुवात केली. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधी चौक पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे येथील पेट्रोलिंगची वाहने तात्काळ लातूर तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आली. 


पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली. विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिलं आणि लवकरात लवकर मेसच्या दरासंदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा, अशी मागणी ही केली. जितक्या लवकर ही मुलं जमली होती तेवढ्याच लवकर ती वापसी फिरली. मात्र प्रश्न जशाला तसा शिल्लक आहे. मेस मालकाचे म्हणणं आहे की, मागील काही दिवसात वाढणारे इंधनांचे दर, भाज्यांचे दर हे खूप अधिक आहेत. त्यामुळे इतक्या कमी पैशांमध्ये मेस चालवणं अशक्य आहे. यामुळे ही भाव वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय एक-दोन मेस मालकांनी नव्हे तर अनेक मेस मालकांनी एकत्रित घेतलेला आहे. मेस चालवणे आमची उदरनिर्वाहाची साधन आहे. यात जर आम्हाला आर्थिक फटका बसत असेल तर दरवाढ शिवाय पर्याय नाही, असे मेस मालकाचे म्हणणे आहे. 


आमच्या भावना सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. तहसीलदारांकडे जाण्याचा निर्णय आम्ही फक्त दहा विद्यार्थ्यांनी घेतला होता. याची माहिती मेसमध्ये जेवायला आलेला विद्यार्थ्यांना लागली आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येथे जमले. आम्हाला कोणतीही आंदोलन करायचं नव्हतं कोणतीही राजकीय पक्ष संघटना यात नाहीत, हे विद्यार्थ्यांची भावना आहे, असे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.