Latur latest Rain Update : मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात धुंवाधांर पाऊस पडत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यालाही पावसाने चांगलेच झोडपले. लातूरमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे लातूरमधील दोन पूल वाहून गेले आहेत. लातूर जिल्ह्यात काल पासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लातूर उदगीर मार्गाचे काम सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणी पर्यायी पूल निर्माण करण्यात आले होते. लातूरवरून उदगीरकडे जाणारा राज्यमार्ग बंद आहे. तर चांभरगा येथील पर्यायी पूल आणि नरसिंगवाडी पाटी येथीलही पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला आहे. 


कालपासून पडत असलेल्या पावसामुळे चांभरगा गावाजवळील लहान ओढ्यात पाणी आल्याने सिमेंटचे मोठे पाईप टाकून करण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला आहे.  यामुळे रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे उदगीरसह चामरगा, बावलगाव, जंगम वाडी, वेरूळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तर उदगीर वरुन लातूरला जाणार्‍या लोहारा गावाजवळील नरसिंगवाडी पाटी येथील पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे उदगीरहून लातुरकडे जाणारा राज्यमार्ग बंद झाला आहे. एसटी वाहतूक आणि ईतर वाहतुक बंद झाली आहे.


आष्टा मोड ते उदगीर या राज्यमार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासुन सुरु आहे. ज्या ज्या ठिकाणी ओढे आहेत त्या ठिकाणी जुने पुल पाडूण नव्या पुलाचे काम सुरू आहे. हे काम संत गतीने सुरु आहे. पर्यायी व्यवस्था म्हणुन सिमेंटचे पाईप टाकूण पर्यायी पुल तयार करण्यात आले होते. भर पावसाळ्यात पुलाचे काम होत आहे. हे पर्यायी पूल धोकादायक आहेत. त्यातच हेच पूल वाहून गेले आहेत.  लातूर वरून उदगीरकडे जाण्यासाठी चाकुरकडून वाहतूक वळविण्यात आली असली तरी वाहतूक बंद झालेल्या मार्गावरील अनेक गावाचा संपर्क बंद झाला आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणी ओसरण्याची वाट पाहिली जात आहे. पर्यायी पुलाचे काम नुकसान झाले आहे हे पाणी ओसरल्या नंतरच स्पष्ट होईल. त्यानंतर पूलाची डाग डुजी केल्यानंतर मार्ग खुला होणार आहे. 


उदगीरचे आमदार माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घटनास्थळाला भेट दिली, प्रशासनाला युद्धपातळीवर वाहतूक योग्य रस्ता बनवण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. या मार्गावरील पुलाचे काम सुरू असल्या कारणाने जिल्हा पर्यायी रस्ता आणि पूल बनवण्यात आला होता. मात्र पावसामुळे या पर्यायी पुलाचे  नुकसान झाले आहे. हा मार्ग वाहतूक योग्य बनवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेले आहेत, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.