Latur Hotel Worker Death News: एकाच हॉटेलमध्ये काम करत असलेल्या तीन कामगारांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातुरात घडली आहे. यामधील दोन कामगारांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर एका कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


लातूर तुळजापूर हायवेवरील धाब्यावर तीन जण कामगार म्हणून काम करत होते. या तिन्ही कामगाराचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. औसा तालुक्यातील उजनी येथील विश्व हॉटेलमध्ये कामाला असलेल्या तीन कामगरावर आज काळाने घाला घातला आहे. उजनीच्या जवळच असलेल्या टाका या गावातील चंद्रकांत नगराळे (वय-28) आणि सूर्यदिप शिंदे (वय-24) हे दोघे मागील अनेक वर्षापासून विश्व हॉटेल मध्ये कामगार म्हणून काम करत होते. एकाच गावातील रहिवासी असल्यामुळे त्याच्यात मैत्री ही होती. दररोज एकाच गाडीवरून ते ये जा करत होते. मागील काही दिवसापासून याच हॉटेल वर गोपाळ खंडाळकर (वय 48) हेही कामगार म्हणून कामावर येत होते.


Latur Hotel Worker Death News: काय घडले आज?


चंद्रकांत नगराळे आणि सूर्यदिप शिंदे रोजच्या प्रमाणे कामावर निघाले होते. दररोज सकाळी 6 वाजता ते घरातून बाहेर पडत होते. लातूर तुळजापूर हायवेवरील भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकीवरून पडून या दोन मित्राचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती भादा पोलिस ठाण्याला समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. याबाबत भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत
        
सकाळी सहा वाजता घटना घडल्यानंतर तात्काळ त्याची माहिती हॉटेलवर कळाली. अपघाताची बातमी कळल्यापासून गोपाळ खंडाळकर यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि सकाळी सात वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचाही मृत्यू झाला. त्यावेळेस ते त्यांच्या घरीच होते. 45 वर्षीय गोपाळ खंडाळकर यांना मागील काही दिवसापासून शुगर आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता अशी माहिती आहे.
   
एकाच हॉटेलवर काम करणाऱ्या तीन कामगारांचा एकाच दिवशी अवघ्या दोन तासांमध्ये मृत्यू झाल्याने या परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


ही बातमी वाचा: