लातूर: ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election Results) झालेल्या पराभवानंतर पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी राडा घातला आणि विजयी मिरवणुकीवर दगडफेक केली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे ही घटना घडली असून त्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. तर अनेक वाहनाचे नुकसान झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 


लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Latur Gram Panchayat Election Results) मंगळवारी जाहीर झाला. गावात विजयी उमेदवाराची मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र याच मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यात एक जखमी तर अनेक वाहनाचे नुकसान झाले. यासंबंधी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे.


निलंगा येथून विजयी उमेदवार गावात आल्यानंतर गावातील बस्वराज संगप्पा पाटील आणि अन्य 12 साथीदारांनी अचानक दगडफेक करून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केलं. या दगडफेकीत एक कार, एक जीप, एक बुलेट यांचे नुकसान झालं. याविषयी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात 13 लोकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


निलंगा तालुक्यातील 68 गावच्या ग्रामपंचायत निकालात (Latur Gram Panchayat Election Results) अनेक गावात धक्कादायक निकाल लागले असून दिग्गज पुढाऱ्यांना यात पराभव पत्करावा लागलाय. मात्र तांबाळा गावात आपले पॅनल पडल्याचा राग मनात धरून तेथील बारा-तेरा लोकांच्या जमावाने विजयी उमेदवारांच्या घरावर आणि गाड्यावर दगडफेक करून मोठे नुकसान केले आहे. 


Latur Gram Panchayat Election: लातूरमध्ये भाजपची बाजी


लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे.  जिल्ह्यातल्या 153  ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा तर काँग्रेसला 73 ग्रामपंचायतींवर  विजय मिळवता आला.जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींपैकी 153 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकलाय. दुसऱ्या स्थानावर  काँग्रेसनं उडी मारत 73 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानी असून 42  ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिल्या आहे. 


शिवसेनेच्या ठाकरे गटानं 16 ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटानं देखील तीन ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व निर्माण केलंय. या निकालामुळं भाजपच्या गोटात मात्र जल्लोषाचं वातावरण निर्माण झाल्यानं भाजपच्या वतीनं जिल्हाभरात जल्लोष केला जात आहे.