Latur News Update : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur) घडली आहे. एका दिव्यांग महिलेवर ( Disabled woman) अत्याचार (Sexual assault ) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिव्यांग महिलेवर अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित महिला ही कर्णबधीर आणि मुकबधीर आहे. तिच्या असहाय्यतेच्या फायदा घेत संशयितांने तिच्यावर अत्याचार केले आहेत. या घटनेनंतर पीडित महिला आपल्या नातेवाईकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. परंतु, पोलिसांनी पीडितेची तक्रार घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर नातेवाईक आणि एका सामाजिक संस्थेच्या रेट्यामुळे पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल करून घेतला, अशी माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी ही धक्कादायक घटना घडली आहे. सहा दिवसांपूर्वी दिव्यांग तरुणीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केले. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ गातेगाव पोलीस ठाणे गाठत संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
पीडितेवर काय अन्याय झालाय हे सांगंण्यास सक्षम नसलेल्या या तरुणीच्या सांगण्यावरून नेमका काय गुन्हा दाखल करावा असा पेच गातेगाव पोलिसांसमोर पडला होता. त्यामुळे गातेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी बराच वेळ घेतला. यामुळे पीडितेचे मेडिकल होऊ शकले नाही. निर्धार सेवाभावी संघटना आणि नातेवाईकांनी लातूरचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांकडून आंदोलन मागं घेण्यात आलं. गातेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेचे नातेवाईक आणि नागरिकांमधून होत आहे.
महत्वाच्या बातम्या