Latur: आजकाल शेत नांगरण्यासाठी खेड्यापाड्यातही सर्रास ट्रॅक्टर वापरला जातो. क्वचितच कोणीतरी बैलजोडी वापरतं.  पण यातच लातूरच्या 75 वर्षीय शेतकऱ्याला मदतीचा हात देत त्याच्या जीवनात आशेचा नवा किरण दाखवणारी ही हृदयस्पर्शी कहाणी समोर आलीय. बैलजोडी नसल्यानं 75 वर्षांचे अंबादास पवारांनी स्वत:च औताला जुंपलं. अंतर्गत मशागतीच्या कामासाठी कोळपणी करण्यासाठी स्वत:च नांगर ओढायला सुरुवात केली. सोबत होती पत्नीची. या शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेकजण पुढे आले. पावसाळी अधिवेशनातही मुद्दा गाजला. कृषीमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली खरी पण मदत काही मिळाली नाही.

ही बातमी समजल्यावर, क्रांतीकारी शेतकरी संघटनेनं एक लाख रुपये जमा करून त्यांना बैलजोडी दिली. वर्गणीतील पैशातून आलेली बैलजोडी मिळताच वृद्ध शेतकरी माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.'मला वाटत नव्हते की माझ्या धन्याच्या खांद्यावरील जू उतरेल. पण ते तुम्ही उतरविले. अशा भावना शेतकऱ्याच्या पत्नीनं व्यक्त केल्या.

पत्नीला सोबत घेत स्वत:च लागले कोळपणीला..

अंबादास पवार हे अहमदपूर तालुक्यातील हडोळतीचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे  2 एकर 9 गुंठे शेती आहे. खरीपांच्या पेरण्यांपूर्वीची अंतर्गत मशागत सध्या ते करत होते. पण हातात ना बैलजोडी ना ट्रॅक्टर. शेवटी 75 वर्षांच्या शेतकऱ्यानं स्वत:च कोळपणी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हा व्हिडिओ व्हायरल झाला. नंतर अनेकजण पुढे आले. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी या वृद्ध शेतकऱ्याच्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने लातूरमधील कार्यकर्त्यांना मदतीसाठी पुढे यायला सांगितले. अवघ्या चार दिवसांत एक लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला आणि नव्या बैलजोडीसह कार्यकर्ते थेट अंबादास पवार यांच्या घरी पोहोचले.

दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

या क्षणी पवार दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. 'माझ्या नवऱ्याच्या खांद्यावरचं ओझं उतरलं, असं वाटतंय. तुमच्या मदतीमुळे आमचं आयुष्य पुन्हा रुजल्यासारखं वाटतंय,' अशा शब्दांत त्या माऊलीने तुपकरांशी फोनवर बोलून आपल्या भावना व्यक्त केल्या.

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही त्यांना धीर देत सांगितलं, "तुम्ही एकटे नाही. राज्यातल्या प्रत्येक गरजू शेतकऱ्याच्या मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत. सरकार फक्त घोषणा करतं, पण आम्ही कृतीतून साथ देतो. सोनू सूद यांचंही सहकार्य येणारचं आहे. पण तुम्ही धन्यवाद देऊ नका, कारण हे आमचं कर्तव्यच आहे."

हेही वाचा:

शेतकरी भावाला दिला मोठा हिस्सा, दोन प्राध्यापक भावांची 'आदर्श' वाटणी; आई बापाचे पांग फेडले, नात्याचं मोलही जपलं