लातूर : मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उतरवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून वदवून घेणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज युटर्न घेतला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोणी शपथ घेतली होती? असा प्रश्न बावनकुळेंनी भंडाऱ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत विचारला होता. त्यानंतर 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असाही प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली होती. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी बावनकुळे यांनी युटर्न घेत, मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठ नेत्यांना असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांना याबाबत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटतं की, देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या पक्षातीलच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, त्यात गैर काय?, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला. तसेच, पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्याच्या अधिकार मला नाहीत. निर्णय घेण्याच्या अधिकार हे केंद्रीय पार्लमेंट बोर्ड आणि आमचे वरिष्ठ नेत्यांना आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले होते बावनकुळे?
भंडाऱ्यातील लाखनी इथं भाजपकडून घेण्यात आलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या अनुषंगानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोणी शपथ घेतली होती? असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना केला. 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना केला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले.
बावनकुळे यांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे उत्तर...
यावर बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले की, "पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले असून, लोकांनी भाजपला बऱ्याच राज्यात स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आत्मविश्वास वाढणे सहाजिक आहे. जसा बावनकुळे यांचा संकल्प आहे तसा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून, अजित पवार 2024 ला मुख्यमंत्री असतील असा आमचा संकल्प असून, अजित दादा देखील वानखेडे स्टेडियमवरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. यासाठी आम्ही स्वतःला झोकून देऊन काम करू,” असे अमोल मिटकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: