Latur News : लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी या गावातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलांच्या शैक्षणिक लाभासाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलीय. 'हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय', असं म्हणत जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. या दुर्दैवी घटनेने दादगी गावात एकच शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (32) या तरुणाने जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी विजेच्या करंटाचा धक्का घेत जीवन संपवले. मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहलंय?

“माझे दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवत आहे. लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही, हे सरकार प्रमाणपत्र देत नाही... म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय.” असा अशायाचे पत्र लिहत शिवाजी मेळ्ळे या 32 वर्षीय तरुणाने जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, कोळी महादेव समाजाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आता होत आहे.

Continues below advertisement

दरम्यान, मागील दोन वर्षापासून या भागांमध्ये सातत्याने मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाने उर्वरित महाराष्ट्र राज्य लागू असेलेले निकष आहेत, तेच निकष लावून आम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात यावेत. व्हॅलिडीटी सोपी आणि सहज करावी, यासाठी आंदोलन उभं केलं होतं. 17 तारखेला मराठवाडाभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर ही आत्महत्या आंदोलनाला आणखीन तीव्र करेल अशी चिन्ह आहेत.

कायदा एकच, मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजावर अन्याय का?

मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी समाज गेल्या चार दशकांपासून अनुसूचित जमातीचे (एस.टी.) प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. मराठवाडा वगळता अन्य ठिकाणी प्रमाणपत्र मिळते, मग या विभागातील ८ जिल्ह्यातील या समाजबांधवावर अन्याय का? असा सवाल उपस्थित होत आहे.न्याय हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ८ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार आहेत.

'कोळी' ही मुख्य जमात असून तिच्या उपजमातींना महाराष्ट्राच्या विविध भागांत अनुसूचित जमातीचा लाभ मिळतो. तत्कालीन आदिवासी मंत्री कै. मधुकर पिचड, संशोधन आयुक्त गोविंद गारे यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी 'कोळी' नोंदीवरूनच प्रमाणपत्रे मिळवली आहेत. मात्र, मराठवाड्यातील समाजाला याच कायद्यातून न्याय मिळत नाही, ही समाजाची खंत आहे.

हेही वाचा