लातूर : तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. लातुरात तूर खरेदी केंद्र बंद केल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी तूरच जाळली. लातुरातील चाकूर आणि जळकोट येथील शेतकऱ्यांनी तूर जाळून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

हजारो क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. मुदत संपल्याने तूर खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या लातुरातील शेतकऱ्यांनी तूर जाळली.

दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीपासून नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यामुळं अडचणीत आलेला शेतकरी आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळं झोपी गेलेल्या सरकारला जाग आली असून, तूर खरेदीची मुदत वाढवण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दरबारी केली आहे.

22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या खरेदी केंद्रावर पोहोचलेल्या तुरीच्या खरेदीची मुभा देण्यात यावी अशी मागणी फडणवीसांनी केंद्राकडे केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला अद्याप मंजुरी मिळाली नसल्यानं शेतरकऱ्यांचा जीव टांगणीलाच लागला आहे. दुसरीकडे, डाळीचे दर स्थिर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयात शुल्क वाढवण्याची सूचनाही केंद्र सरकारला केली आहे. मात्र तुरीच्या वाढीव उत्पादनाची कल्पना असूनही, खरेदीसंदर्भात योग्य तरतूद करण्यात फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरल्याचंच दिसून येते आहे.

संबंधित बातम्या :

... तर स्वत: पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार : बच्चू कडू

22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रांवर आलेल्या तुरीचीच खरेदी : मुख्यमंत्री

कोणत्या जिल्ह्यात किती तूर शिल्लक, किती विक्री?

सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय

काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक