Lalbaugcha Raja Visarjan 2025 मुंबई: मुंबईसह जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजाचे (Lalbaugcha Raja Visarjan 2025) रविवारी (7 सप्टेंबर) रात्री नऊ वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. यंदा लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी तब्बल 33 तास लागले. लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10 वाजता विसर्जनासाठी मंडपातून निघाला होता. यानंतर तो मजल दरमजल करत रविवारी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. यानंतर दीड-दोन तासांत लालबागचा राजाचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, सुमद्राला आलेली भरती आणि नवीन तराफ्यावर मूर्ती न चढवता आल्याने लालबागचा राजाचे सकाळी दहा वाजता होणारे विसर्जन रात्री 9 वाजता झाले. जवळपास 12 ते 13 तास लालबागचा राजाचं विसर्जन खोळबलेलं पाहायला मिळाले. यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली.

Continues below advertisement

यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक यंत्रणा असलेला नवीन तराफा बनवण्यात आला होता. दरम्यान, हा तराफा गुजरातमधून बनवल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता. परंतु आता लालबागचा राजा मंडळाकडून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात आलेल्या नवीन तराफाबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आलेला तराफा हा गुजरातमधील नव्हे तर ठाण्यात तयार करण्यात आला होता. 

लालबागचा राजाचा तराफा कुठे तयार केलेला? (Lalbaugcha Raja Tarafa)

लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी यंदा अत्याधुनिक तराफा दाखल झाला. हा तराफा गुजरातच्या कंपनीने बनवल्याच्या माहितीत तथ्य नाही. शॉफ्ट शिपयार्डने हा तराफा बनवला आहे. ही कंपनी ठाण्याची आहे. जुना तराफाही याच कंपनीने बनवला होता, असं लालबागचा राजा मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

लालबागचा राजा मंडळाकडून पहिली अ‍ॅक्शन-

लालबाग राजा मंडळ गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. समुद्राला मोठी भरती असल्याने लालबाग राजाचे विसर्जन रविवारी विलंबाने झाले.  मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केली. त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दावा दाखल करण्याचा निर्णय लालबाग राजा मंडळाने घेतला आहे. लालबाग राजाच्या विसर्जनाबाबत सोशल मीडियात विनाकारण वावड्या उठवण्यात आल्या. त्यासाठी हिरालाल वाडकर यांच्या दाव्याचा आधार घेण्यात आला. हिरालाल वाडकर यांचा लालबाग राजा मंडळाशी काही संबंध नाही. कधीच त्यांनी राजाचे विसर्जन केले नाही. केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतूने हिरालाल वाडकर व्हिडिओ प्रसिद्ध केला असल्याचे लालबाग राजा मंडळाचे म्हणणे आहे. 

संबंधित बातमी:

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा मंडळाकडून पहिली अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला न्यायालयात खेचणार, नेमकं काय घडलं?